Asia Cup 2023 : पाकिस्तानमधील मुल्तान येथील मैदानावर आशिया चषकाला दिमाखात सुरुवात झाली. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यामध्ये सलामीच्या सामन्याला सुरुवात झाली. पाकिस्तान संघ आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. नेपाळपुढे तगड्या पाकिस्तानचे आव्हान असेल. पाकिस्तानची धुरा अनुभवी बाबर आझम याच्याकडे असेल तर नेपाळची धुरा 20 वर्षीय रोहितच्या खांद्यावर आहे.  सहा संघामध्ये एकदिवसीय फॉर्मेटमध्ये आशिया चषक होणार आहे. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरोधात होणार आहे. सहा संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे.  






नेपाळचे आशिया चषकात पदार्पण - 


नेपाळच्या संघाने आशिया चषकात पदार्पण केले आहे. 20 वर्षीय रोहित पौडेल याच्याकडे नेपाळच्या संघाची धुरा आहे. नाणेफेकीवेळी रोहित म्हणाला की, संघातील सर्व सहकारी आनंदात आहेत. आशिया चषकात आमचा पहिलाच सामना आहे. नेपाळमधील प्रत्येक व्यक्ती उत्साहित आहे. 


नेपाळने आशिया चषकात आज पदार्पण केले. आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये नेपाळ संगाने दमदार कामगिरी केली आहे. पण पाकिस्तानविरोधात विजय मिळवणं नेपाळसाठी सोपं नसेल. पण नेपाळकडे गोलंदाजी दमदार आहे. संदीप लामिछाने हा अनुभव गोलंदाज आहे, तो एक्स फॅक्टर ठरु शकतो. 






हायब्रिड मॉडेलनुसार आशिया चषक - 


यंदाच्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. पण भारताने पाकिस्तानात जाऊन सामने खेळण्यास नकार दिला. त्यानंतर ही स्पर्धा हायब्रिड पद्धतीने खेळवली जाईल, असे निश्चित झाले. याअंतर्गत मुल्तान आणि लाहोर येथे आशिया चषकाचे 4 सामने खेळले जातील, तर श्रीलंकेत 9 सामने होतील.


कशी रंगणार स्पर्धा - 


आशिया चषकात एकूण सहा संघ भाग घेत आहेत, त्यांना दोन गटात विभागले आहे. अ गटात भारत, नेपाळ आणि पाकिस्तान संघांना ठेवण्यात आलेय.  तसेच, ब गटात अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. यानंतर सुपर 4 फेरीत दोन्ही गटातील अव्वल 2 संघ एन्ट्री करतील. सुपर 4 फेरीत प्रत्येक संघ एकमेकांशी एक वेळा भिडतील. त्यामधील आघाडीचे दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील. 






पाकिस्तानने नाणेफेक जिंकली - 


पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. आशिया चषक सुरु होण्याच्या पूर्वसंध्येलाच पाकिस्तान संघाने प्लेईंग 11 ची घोषणा केली होती. पाहा दोन्ही संघात कोण कोणते खेळाडू ?


पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन -


फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रऊफ


नेपाळच्या संघात कोणते शिलेदार : 


कुशल भुर्टेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), आरिफ शेख, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह ऐरी, गुलसन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी


फुकटात पाहा सामने - 


भारत, श्रीलंका आणि उपखंडातील कोणत्याही भागात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर हे सर्व सामने पाहता येतील. तसेच, डिज्नी प्लस हॉटस्टारवर मोफत या सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल. त्याशिवाय एबीपी माझावरही यासंदर्भात सर्व माहित मिळेल.