Asia Cup 2023 : आगामी आशिया चषकासाठी अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवड समिती सोमवारी 17 सदस्यीय भारतीय संघाची निवड करणार आहे. या बैठकीला कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविडही उपस्थित असतील. भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होत आहे, त्याआधी पहिल्यांदाच बीसीसीआयने कोच राहुल द्रविड याच्यासोबत चर्चा केली. 


केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे अद्याप तंदुरुस्ती सिद्ध करू शकले नाहीत. बेंगळुरु येथील एनसीएमध्ये दोघांनीही कसून सराव केलाय. सराव सामन्यातही त्यांनी सहभाग नोंदवला होता. पण त्यांच्या फिटनेसबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे बीसीसीआय संघ निवडीसाठी विलंब लागला. आता बीसीसीआय सोमवारी संघ निवड करेल. आशिया चषकासाठी 17 जणांच्या चमूची निवड करण्यात येणार आहे. अय्यर आणि राहुल दुखापतग्रस्त असल्यामुळे त्यांच्या पर्यायी खेळाडूंनाही आशिया चषकात संधी दिली जाईल.  पाकिस्तान आणि बांगलादेश संघानी आशिया चषकासाठी 17 जणांच्या चमूची निवड केली आहे. 


विश्वचषकासाठी 15 जणांच्या संभाव्य खेळाडूंची यादीही जाहीर करण्यात येईल. आयसीसीच्या नियंमानुसार, 5 सप्टेंबरपर्यंत विश्वचषकाच्या संभाव्य संघाची घोषणा करायची आहे. 27 सप्टेंबरपर्यंत 15 जणांच्या खेळाडूंची यादी आयसीसीला द्यायची आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. आशिया चषक म्हणजे विश्वचषकाची रंगीत तालीम होय. आशिया चषकानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधात मायदेशात तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या सरवासाठी भारताकडे खूप कमी सामने शिल्लक आहेत. त्यामुळे आशिया चषकात भारतीय संघ संपूर्ण ताकदीने उतरणार आहे. 


राहुल तंदुरुस्त, अय्यरबाबत सस्पेन्स, तिलकच्या नावाची चर्चा - 


केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. नेटमध्ये केएल राहुल याने फलंदाजी आणि विकेटकिपिंगचा जोरदार सरवा केला आहे. त्याशिवाय एनसीएमधील सराव सामन्यातही त्याने प्रभावीत केलेय. दुसरीकडे श्रेयस अय्यर याच्या फिटनेसबाबत सस्पेन्स आहे. ESPNCricinfo च्या वृत्तानुसार, एनसीबीमधील सराव सामन्यात अय्यर फक्त 38 षटके मैदानात होता. 50 षटकासाठी तो अद्याप पूर्णपणे फिट नाही. अशात अय्यरच्या निवडीबाबत सस्पेन्स आहे. राहुलची निवड जवळपास निश्चित मानली जातेय. अय्यरच्या अनुपस्थितीत युवा तिलक वर्मा याला संधी मिळण्याची शक्यता आहे.


पांड्याचे उपकर्णधारपद धोक्यात ?


आशिया चषकात हार्दिक पांड्या याचे उपकर्णधारपद धोक्यात आलेय. वेस्ट इंडिजमध्ये हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वात उणीवा जाणवल्यामुळे टीम मॅनेजमेंट विचार करत आहे. जसप्रीत बुमराह याच्या नावाचाही निवड समिती विचार करु शकते. आयर्लंड दौऱ्यात त्यामुळेच जसप्रीत बुमराह याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलेय.  त्याशिवाय 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरोधात जसप्रीत बुमराह भारतीय संघाचा उपकर्णधार होता. आता आशिया चषक आणि वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांच्यामध्ये उपकर्णधारपदासाठी रेस असेल. 


संजूचा पत्ता कट होणार ?


केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. त्याची निवड जवळपास निश्चित मानली जातेय. राहुल भारताचा आघाडीचा विकेटकिपर आहे. तर ईशान किशन याला पर्यायी विकेटकिपर म्हणून खेळवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून संजूपेक्षा ईशान किशन याला संधी दिली जातेय. राहुल तंदुरुस्त असेल तर संजू सॅमसन याचा पत्ता कट झाल्याचे बोलले जातेय. त्याशिवाय श्रेयस अय्यर तंदुरुस्त नसेल तर तिलक वर्मा याला संधी दिली जाऊ शकते. 


अश्विनला संधी मिळणार का ?


अनुभवी आर. अश्विन याला आशिया चषकासाठी आणि वर्ल्डकपसाठी संधी दिली जाऊ शकते. अश्विनकडे दांडगा अनुभव आहे, त्याशिवाय तळाला फलंदाजीही करु शकतो. भारतीय खेळपट्ट्यावर सामने होणार आहेत, त्यामुळे अश्विन याला संधी मिळू शकते. पण अश्विन आणि चहल यांच्यापैकी एकाच गोलंदाजाला 17 जणांच्या चमूत निवडले जाऊ शकते. किंवा अक्षर पटेल याचा पत्ता कट होऊ शकते. 


आशिया चषकासाठी भारताचा संभाव्य संघ -


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर, subject to fitness), श्रेयस अय्यर (subject to fitness), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, युजवेंद्र चहल/आर अश्विन