Ashesh Test Aus vs Eng : ब्रिस्बेन येथे झालेल्या अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवला. कर्णधार जो रुटची विक्रमी खेळी आणि डेव्हिड मलानसोबत झालेली भागिदारीदेखील इंग्लंडला पराभवापासून वाचवू शकली नाही. कसोटीच्या चौथ्या दिवशीच सामन्याचा निकाल आला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची कामगिरी या कसोटीत प्रभावी ठरली. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या 20 धावांचे लक्ष्य होते. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान एलेक्स कॅरी याची विकेट गमावत पूर्ण केले.
नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडला धक्का बसला होता. इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 147 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने पाच बळी घेतले. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिला डावात धावांचा डोंगर उभारला. ट्रेव्हिस हेडने 152 धावांची खेळी केली. त्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 425 धावा उभारत 278 धावांची आघाडी घेतली.
इंग्लंडची दुसऱ्या डावातही फारशी चांगली सुरुवात झाली नाही. 61 धावांवर त्यांनी दोन गडी गमावले. त्यानंतर रुट आणि मलान यांनी डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी 159 धावांची भागिदारी रचली. मलान 82 धावांवर बाद झाला. मलान हा फिरकीपटू नॅथन लायनचा 400 वा बळी ठरला. मलान बाद झाल्यानंतर जो रुटदेखील 89 धावांवर बाद झाला. त्यानंतर इंग्लंडचा डाव कोसळला.
कसोटीतील विक्रम
जो रुट याने इंग्लंडकडून एका वर्षात सर्वाधिक धावा रचण्याचा विक्रम केला. तर, ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायन याने 400 बळींचा टप्पा पूर्ण केला. 400 बळींचा टप्पा गाठणारा लायन हा ऑस्ट्रेलियाचा तिसरा आणि जगातील 17 वा गोलंदाज ठरला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: