Ashes 2023, Edgbaston Test : कर्णधार पॅट कमिन्स याच्या झंझावती फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत थरारक विजय मिळवला. यासह कांगारुंनी अॅशेस मालिकेत विजयाने सुरुवात केली आहे. इंग्लंडने दिलेल्या 281 धावांच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने दोन विकेट राखून केला.  ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स याने नाबाद 44 तर उस्मान ख्वाजा याने 65 धावांचे योगदान दिले. 


ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा याने दोन्ही डावात दमदार फलंदाजी केली. पहिल्या डावात उस्मान ख्वाजा याने 141 धावांची खेळी केली तर दुसऱ्या डावात निर्णायाक 65 धावांचे योगदान दिले. उस्मान ख्वाजाशिवाय दुसऱ्या डावात डेविड वॉर्नर याने 36 धावांची खेळी केली. मार्नस लाबुशेन 13, स्टिवन स्मिथ 06, स्कॉट बोलँड 20, ट्रेविस हेड 16,  कॅमरुन ग्रीन 28, अॅलेक्स कॅरी 20 धावांची खेळी केली. 


281 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागिदारी केली. डेविड वॉर्नर याला ओली रॉबिसन याने तंबूत पाठवले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव ढेपाळला. एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत परतले. दुसऱ्या बाजूला उस्मान ख्वाजा याने एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिला. एका बाजूला विकेट पडत असताना उस्मान ख्वाजा याने दुसरी बाजू लावून धरली.  उस्मान ख्वाजा येने बोलँड याच्यासोबत 32, हेडसोबत 22 आणि ग्रीनसोबत 49 धावांची भागिदारी करत धावसंख्येला आकार दिला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने ख्वाजा याला त्रिफाळाचित करत इंग्लंडच्या आशा उंचावल्या. उस्मान ख्वाजा बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण कर्णधार पॅट कमिन्स याने नॅथन लायन याला हाताशी धरत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला आकार दिला. पॅट कमिन्स याने लायन याच्यासोबत नवव्या विकेटसाठी नाबाद 55 धावांची भागिदारी केली. पॅट कमिन्स याने नाबाद 44 तर नॅथन लायन याने नाबाद 16 धावांची खेळी केली. 






पहिल्या कसोटीत काय झाले ?


अॅशेस कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान इंग्लंडने पहिल्या डावात आठ विकेटच्या मोबदल्यात 393 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून जो रुट याने शतकी खेळी केली.  जो रुट याने 118 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय जॉनी बेअस्टो याने 78 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. इंग्लंडने दिलेल्या 393 धावांच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने प्रभावीपणे केला. कागांरुंनी पहिल्या डावात 386 धावांपर्यंत मजल मारली. उस्मान ख्वाजा याने ऑस्ट्रेलियाकडून शतकी खेळी केली. ख्वाजा याने 141 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय ट्रेविस हेड आणि अॅलेक्स कॅरी यांनीही अर्धशतके झळकावली. हेड याने 50 तर अॅलेक्स कॅरी याने 66 धावांचे योगदान दिले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या 7 धावांनी पिछाडीवर होता. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 273 धावांत संपला.  एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. इंग्लंडकडून जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी प्रत्येकी 46-46 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय कर्णधार बेन स्टोक्स याने 43 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या आहेत. जोश हेजलवूड आणि स्कॉट बोलँड यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.