मुंबई : ऑस्ट्रेलिया विरोधात टीम इंडियाने कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय नोंदवला. खेळाडूंच्या या चमकदार कामगिरीनंतर आता आनंद महिंद्रा यांनी खेळाडूंना भेट देण्याची घोषणा केली आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करून महिंद्रा थार एसयूव्ही 6 खेळाडूंसमोर गिफ्ट देणार असल्याची माहिती दिली आहे.


एकीकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध  शानदार विजयानंतर खेळाडूंवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर आता आनंद महिंद्राने या खेळाडूंना एसयूव्ही भेट देऊन त्यांचे मनोबल आणखी वाढवलं आहे. मोहम्मद सिराज, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, शुभम गिल आणि नवदेव सैनी असे 6 खेळाडू आहेत ज्यांना आनंद महिंद्रा ही भेट देत आहेत.





ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर कसोटी मालिकेच्या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरून आल्यानंतर सिराजने स्वत: साठी बीएमडब्ल्यू कार देखील खरेदी केली. सिराजने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर नवीन कारचा व्हिडिओ शेअर केला आहे.


सहा खेळाडूंची कामगिरी


शुभमन गिलने मालिकेतील 6 डावांमध्ये 2 अर्धशतकांसह 257 धावा केल्या. त्याने चौथ्या सामन्यातील दुसऱ्या डावात 91 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. गिलने दुसऱ्या सामन्यातून कसोटी पदार्पण केलं होतं. टी नटराजनने चौथ्या सामन्यात एकूण 3 फलंदाजांना माघारी धाडलं.


वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या जोडीने निर्णायक कामगिरी केली. या दोघांनी पहिल्या डावात सातव्या विकेटसाठी 123 धावांची विक्रमी भागीदारी केली. शार्दुलने या चौथ्या सामन्यात एकूण 69 धावा केल्या. तसेच 7 विकेट्स घेतल्या. तर सुंदरने पदार्पणातील सामन्यात पहिल्या डावात 62 तर दुसऱ्या डावात 22 धावांची खेळी केली. तसेच 4 खेळाडूंना माघारी पाठवलं.


तर मोहम्मद सिराज या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय ठरला. त्याने या मालिकेत एकूण 13 विकेट्स घेतल्या. नवदीप सैनीने तिसऱ्या सामन्यातून कसोटी पदार्पण केलं. त्याने या सामन्यात एकूण 4 विकेट्स घेतल्या.


एखाद्या खेळाडूला गिफ्ट करण्याची ही आनंद महिंद्रा यांची पहिलीच वेळ नाही. या आधीही त्यांनी असं अनेकदा केलं आहे आणि खेळांडूंचा आत्मविश्वास वाढवला आहे. याआधी बॅटमिंटनपटू किदांबी श्रीकांत याला 2017 मध्ये सीरिज जिंकल्याने TUV 300 कार गिफ्ट केली होती.