नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूंची शारीरिक क्षमता आणि त्यांचं आरोग्य अधिकाधीक सुदृढ आणि निरोगी असण्याची गरज दिवसागणिक वाढतच चालली आहे. मुळात आता संघाचं यशच खेळाडूंच्या निरोगी आरोग्यावर संपूर्णत: अवलंबून आहे. भारतीय क्रिकेट संघात विराट कोहली याच्या नेतृत्त्वामध्ये अनेक खेळाडूंनी शारीरिक सुदृढतेलाही तितकंच महत्त्वं दिल्याचं पाहायला मिळालं.


किंबहुना नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतीय खेळाडूंमध्ये मैदानावरही चपळता पाहायला मिळाली. असं असलं तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलेला क्रिकेटचा स्तर पाहता शारीरिक सुदृढतेकडे तसूभर दुर्लक्षही संघाला अडचणीत टाकणारं ठरु शकतं. त्यामुळं बीसीसीआयनं आता याच दृष्टीनं महत्त्वाची पावलं उचलली आहेत.


खेळाडूंचा वेग आणि एन्ड्युरन्स तपासून पाहण्यासाठी बीसीसीआय यापुढं खेळाडूंची 2-km time trial 2 किमी टाईम ट्रायल घेणार आहे. BCCI शी संलग्न असणाऱ्या सर्वच खेळाडूंसाठी ही चाचणी अनिवार्य असेल. त्यामुळं यो-यो टेस्टसोबतच आता संघात स्थान मिळवण्यासाठी BCCI कडून घेण्यात येणाऱ्या आणखी एका परीक्षेला खेळाडूंना सामोरं जावं लागणार आहे. फक्त सामोरंच नव्हे, तर त्यात त्यांनी उत्तीर्ण होणंही अपेक्षित असणार आहे.


'इंडियन एक्स्प्रेस'शी संवाद साधताना बीसीसीआयशी संलग्न अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. भारतीय क्रिकेट संघाच्या यशात त्यांची शारीरिक सुदृढता महत्त्वाची भूमिका बजावून गेली असंही त्यांनी स्पष्ट केलं. असं असलं, तरीही आता आपणच काही परिसीमा ओलांडत पुढचा टप्पा गाठण्यासाठीच हा निर्णय घेतला गेल्याचंही ते म्हणाले. शिवाय येत्या वर्षांमध्ये सातत्यानं खेळाडूंच्या आरोग्य आणि सुदृढतेच्या दृष्टीनं काही परीक्षा घेण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.


काय आहे नवी परीक्षा?


BCCI च्या या नव्या परीक्षेमध्ये वेगवान गोलंदाजाला 2 किमी टाईम ट्रायल रन 8 मिनिटं 15 सेकंदांमध्ये पूर्ण करावी लागणार आहे. तर, फलंदाज, यष्टीरक्षक आणि फिरकी गोलंदाजांना ही ट्रायल रन 8 मिनिटं 30 सेकंदांमध्ये पूर्ण करावी लागणार आहे. तर, यो-यो टेस्ट उत्तीर्ण होण्यासाठी खेळाडूंना किमान 17.1 अंकांची आवश्यकता असणाऱ आहे. संघातील सर्वच खेळाडूंना या चाचणीबाबत माहिती देण्यात आली आहे.


ही नवी परीक्षा आगामी T20 World Cup साठी भारतीय संघात स्थान निश्चित करु इच्छिणाऱ्या खेळाडूंसाठी अनिवार्य असणार आहे. या चाचणीसाठी बीसीसीआय आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील Strength and Conditioning सदस्यांची उपस्थिती असेल.