Amit Mishra Retirement: भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्रा (Amit Mishra Retirement) याने सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अमित मिश्राने निवृत्तीची घोषणा केली. अमित मिश्राने भारतासाठी 22 कसोटी, 36 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. अमित मिश्राने कसोटीत 76, एकदिवसीय सामन्यात 64 आणि टी-20 मध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत.

निवृत्तीची घोषणा करताना अमित मिश्रा काय म्हणाला?

आज, 25 वर्षांनंतर, मी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो, हा खेळ माझे पहिले प्रेम, माझे शिक्षक आणि माझ्या आनंदाचा सर्वात मोठा स्रोत आहे. हा प्रवास असंख्य भावनांनी भरलेला आहे. मी बीसीसीआय, हरियाणा क्रिकेट असोसिएशन, माझे प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी, सहकारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाहत्यांचा मनापासून आभारी आहे, ज्यांच्या विश्वासाने आणि पाठिंब्याने मला प्रत्येक पावलावर बळ दिले. सुरुवातीच्या दिवसांच्या संघर्ष आणि त्यागांपासून ते मैदानावरील अविस्मरणीय क्षणांपर्यंत, प्रत्येक अध्याय हा एक अनुभव आहे ज्याने मला एक क्रिकेटपटू आणि एक माणूस म्हणून घडवले आहे. चढ-उतारांमध्ये माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल माझ्या कुटुंबाचे आभार. हा प्रवास इतका खास बनवल्याबद्दल माझ्या सहकाऱ्यांचे आणि मार्गदर्शकांचे आभार. हा अध्याय संपवताना, माझे हृदय कृतज्ञता आणि प्रेमाने भरले आहे. क्रिकेटने मला सर्व काही दिले आहे आणि आता मी या खेळाला काहीतरी परत देण्यास उत्सुक आहे, असं अमित मिश्रा म्हणाला. 

अमित मिश्राची कारकीर्द-

अमित मिश्राने 2003 मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2008 मध्ये मोहाली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अमित मिश्राने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या. 2013 मध्ये अमित मिश्राने झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 18 विकेट्स घेत जवागल श्रीनाथच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली. 2014 मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकातही अमित मिश्राने भाग घेतला. या विश्वचषकांत अमित मिश्राने 10 विकेट्स घेतल्या. 2017 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर, अमित मिश्राने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल खेळणे सुरू ठेवले. अमित मिश्राने आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.

गेल्या 7 दिवसांत तीन क्रिकेटपटूंनी केली निवृत्तीची घोषणा-

गेल्या 7 दिवसांत तीन क्रिकेटपटूंनी निवृत्तीची घोषणा केली आहे. 27 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू रवीचंद्रन अश्वीनने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. तर 2 सप्टेंबर 2025 रोजी पाकिस्तान क्रिकेट संघाचा खेळाडू आसिफ अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर आज 4 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय संघाचा खेळाडू अमित मिश्राने  आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घोषणा केली.