New BCCI Selection Committee: भारतीय नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयनं शुक्रवारी धक्कादायक निर्णय घेत चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समिती बरखास्त केली. टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला इंग्लडंकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. भारताच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर निवड समितीच्या कामकाजावर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, बीसीसीसीआयनं नव्या निवडसमितीसाठी तातडीनं अर्ज मागवले आहेत. चेतन शर्मानंतर (Chetan Sharma) निवड समितीचा नवा अध्यक्ष कोण अशा चर्चांना सुरुवात झालीय. निवड समितीच्या शर्यतीत भारताचा माजी वेगवान गोलंदाजाचं नाव आघाडीवर आहे. 


चेतन शर्मानंतर आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर निवड समितीचा नवा अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. याआधीही अजित आगरकर यांनी निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यावेळी त्यांना यश मिळू शकलं नाही. परंतु, यंदा अजित आगरकर यांचीच निवड समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "अजित आगरकरशी अद्याप याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. परंतु त्यांना या पदासाठी अर्ज करायचा आहे. ती त्यांची निवड आहे. मागच्या वेळीही थोडक्यात त्यांचं अध्यक्षपद गेलं होतं", अशी माहिती इनसाइड स्पोर्ट्सनं आपल्या वृत्तात दिलीय. 


निवड समीतीच्या अध्यक्षपदासाठी अटी


1) अर्जदारानं सात कसोटी सामन्यात देशात प्रतिनिधित्व केलेलं असावं किंवा
2) 30 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने  किंवा
3) 10 एकदिवसीय आणि 20 प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणं गरजेचं.


नवीन निवडकर्त्यांवर कोणती मुख्य जबाबदारी असणार?
- प्रत्येक प्रकारच्या संघासाठी कर्णधाराची नियुक्ती करणे
- मजबूत बेंच स्ट्रेंथ तयार करा
- देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय खेळ पाहण्यासाठी प्रवास करा
- संघ निवडीवर मीडियाला संबोधित करा
- योग्य आणि पारदर्शक पद्धतीने शक्य तितका सर्वोत्तम संघ निवडा


अजित आगरकरची कारकिर्द
अजित आगरकरनं तीन्ही फॉरमेटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानं भारतासाठी 26 कसोटी, 191 एकदिवसीय आणि 62 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजित आगरकरनं 288 विकेट्स घेतले आहेत. तर, कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 58 विकेट्सची नोंद आहे. याशिवाय, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला 47 विकेट्स मिळाले आहेत. 


हे देखील वाचा-