Kapil Dev 83 Memories : भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने जिंकलेला 1983 चा विश्वचषक (1983 World Cup) विजय म्हणजे भारतीय क्रिकेटमधील सुवर्णक्षण म्हटलं तर अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही. यंदा 25 जून रोजी या विजयाला 39 वर्षे पूर्ण होणार असून हाच तो विजय ज्याने भारतीय क्रिकेटचा चेहरा-मोहराच जणू बदलला. अंडरडॉग समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजला नमवून इतिहास रचला. या विजयाच्या आठवणी आजही भारतीयांच्या मनात ताज्या आहेत. तर याचवेळेची एक आठवण तत्कालीन कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी सांगितली. कपिल देव त्यावेळी विश्वचषक जिंकल्यानंतर थेट वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रुममध्ये घुसले आणि त्यांच्याच शॅम्पेन बॉटल्स उचलल्याचा किस्सा सांगितला. काही महिन्यांपूर्वी कपिल देव एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात आले असताना त्यांनी ही आठवण सांगितली होती.


नेमकं काय घडलं होतं?


तर वेळ होती 1983 सालची. त्यावेळचा भारतीय संघ विश्वचषक जिंकणं म्हणजे साऱ्यांनाच आश्चर्यचकित करणारं होतं. कारण अधिक सोय-सुविधा नसताना वेस्ट इंडिज या त्यावेळच्या सर्वात चॅम्पियन संघाला मात देऊन विश्वचषक जिंकण कोणत्याही संघाला अवघडचं होतं. पण त्याचवेळी संघात असणाऱ्या सर्व खेळाडूंनी जिवाचं रान केलंच, पण संघाचे कर्णधार कपिल देव यांनी सुरुवातीपासून अतिशय सकारात्मक विचारांसह अप्रतिम अष्टपैलू खेळ दाखवत सर्व सामने जिंकण्याच्याच दृष्टीने खेळले. ज्यामुळे अखेरचा सामना बलाढ्य वेस्ट विडिंजला 43 धावांनी मात देत भारताने जिंकला. त्यानंतर काय नुसता जल्लोष आणि आनंदमय वातावरणात भारतीय खेळाडू विजयाचं सेलिब्रेशन करत होते.


त्यावेळी मैदानावर पराभवानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हात मिळवण्याची प्रथा नसल्याने खेळाडू एकमेंकाच्या ड्रेसिंग रुममध्ये जात असतं. ज्यामुळे कर्णधार कपिल हेही वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रुममध्ये गेले. त्यांनी तिथे पाहिले तर विंडीजनी सेलिब्रेशनसाठी बऱ्याच शॅम्पेनच्या बॉटल्स आणून ठेवल्या होत्या. त्यापाहून कपिल हे विंडीजचा कर्णधार क्लाइव्ह लॉयडसमोर 'आता तुम्हाला याची काय गरज?' असं मिश्किलपणे म्हणत, त्यांच्या शॅम्पेन बॉटल्स उचलून घेऊन आले. ज्यानंतर विंडीजने ठेवलेल्या शॅम्पेन बॉटल भारतीय खेळाडूंनी उडवत आनंद साजरा केला. कपिल यांनी सांगितलेल्या या किस्स्यातून तत्कालीन काळात सर्व खेळाडू आणि संघामध्ये किती खेळीमेळीचं वातावरण होतं, याचा प्रत्यय येतो.


हे देखील वाचा-