नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी 20 मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेनं प्रत्येकी एका सामन्यात विजय मिळवला आहे. यामुळं मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माला राहिलेल्या तीन टी 20 सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करुन विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. 

Continues below advertisement

Abhishek Sharma : अभिषेक शर्मा विराट कोहलीचा विक्रम मोडणार?

टी 20 क्रिकेटमध्ये भारताकडून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीनं हा विक्रम 2016 मध्ये केला होता. विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी अभिषेक शर्माकडे आहे. विराट कोहलीनं 31 टी 20 सामन्यांमध्ये 2016 मध्ये 1614 धावा केल्या होत्या. 2025 या कॅलेंडर वर्षात अभिषेक शर्मानं 39 टी 20 सामन्यांमध्ये 1533 धावा केल्या आहेत. अभिषेकला विराटचा विक्रम मोडण्यासाठी 82  धावांची गरज आहे. आगामी तीन टी 20 सामन्यात अभिषेक शर्मा ही कामगिरी करु शकतो.

अभिषेक शर्मानं यापूर्वी भारताचा टी 20 संघाचा कॅप्टन सूर्यकुमारचा विक्रम मागं टाकला आहे. सूर्यकुमार यादवनं 2022 मध्ये 1503 धावा केल्या होत्या. टी20 क्रिकेटमधील या धावा भारताकडून खेळले गेलेले सामने आणि आयपीएलमधील सामन्यांमधील आहेत. अभिषेक शर्मानं 2025 मध्ये भारताकडून खेळताना 790 धावा केल्या आहेत. पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबरला हिमाचल प्रदेशचा धर्मशाला येथे होणार आहे. 

Continues below advertisement

पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारतानं जिंकला. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताला पराभूत केलं. आता तिसरा सामना धर्मशाला येथे होणार आहे. या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाला मालिकेत आघाडी मिळेल. धर्मशाला येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 187 इतकी आहे. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका  यांच्यातील राहिलेले तीन सामने महत्त्वाचे आहेत. भारतानं सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात एकही टी 20 मालिका गमावलेली नाही. त्यामुळं ही मालिका जिंकायची असल्यास तिसरी टी 20 मॅच महत्त्वाची आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या निमित्तानं भारतासाठी या मालिकेतील विजय महत्त्वाचा आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये भारताची कामगिरी चांगली झाली नव्हती. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव अपयशी ठरले. तर, अभिषेक शर्माला चांगली सुरुवात केल्यानंतर मोठी खेळी करता आली नव्हती.एकट्या तिलक वर्मानं अर्धशतक केलं होतं. 

तिसऱ्या टी 20 साठी भारताचा संभाव्य संघ :

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन/शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.