पणजी : महाराष्ट्राच्या पुरुष कबड्डी संघाने उपांत्य सामन्यात हरयाणाकडून २९-३९ असा पराभव पत्करल्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. कॅम्पाबेल मल्टपर्पज क्रीडा संकुल येथे झालेल्या सामन्यात आक्रमक सुरुवात करीत हरयाणाने १२व्या मिनिटाला महाराष्ट्रावर पहिला लोण देत १८-११ अशी आघाडी घेतली. मध्यंतराला २०-१६ अशी नाममात्र आघाडी हरयाणाकडे होती. उत्तरार्धात आणखी एक लोण देत ती ३३-२२ अशी वाढवली. महाराष्ट्राला हरयाणावर लोण देण्याची नामकी संधी आली होती. मैदानावर शिलकी तीन खेळाडू होते आणि अजय नरवालची तिसरी चढाई होती. या चढाईत त्याने अरकमला टिपले व त्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूची पकड झाली. त्यामुळे तो होणारा लोण हरयाणाने वाचवला. महाराष्ट्राच्या शंकर गदई व किरण मगर यांनी एक-एक  अशा दोन अव्वल पकडी केल्या. पण त्याचे रुपांतर विजयात करता आले नाही. 


महाराष्ट्राकडून अस्लम शेख, आदित्य शिंदे, आकाश शिंदे, किरण मगर, शंकर गदई यांनी संघाचा पराभव टाळण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. त्यात ते अपयशी ठरले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सेनादलाने चंदीगड ४९-२५ असे नमवत अंतिम फेरीत धडक दिली. सेनादलविरुद्ध हरयाणा अशी पुरुषांत, तर हिमाचल प्रदेश विरुद्ध हरयाणा अशी महिलांत अंतिम लढत होईल. महाराष्ट्राला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कबड्डीमध्ये यंदा एकच कांस्यपदक मिळवता आले. महाराष्ट्राच्या महिला संघाचे आव्हान सोमवारी साखळीतच संपुष्टात आले. मागील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने दोन्ही गटांत रौप्यपदके पटकावली होती.


सुरुवातीच्या पाच मिनिटांमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेऊन प्रतिस्पर्धी हरयाणावर चांगले दडपण निर्माण केले होते. पण ते टिकवण्यात अपयशी ठरलो. पाच मिनिटे बाकी असताना हरयाणाचे तीनच खेळाडू मैदानावर होते. त्यावेळ लोण देत सामन्यावर पकड निर्माण करण्याची संधी आपण दवडली. अन्यथा, महाराष्ट्र अंतिम फेरीत पोहोचला  असता आणि सुवर्णपदकावर दावेदारी केली असती. महाराष्ट्राच्या संघातील सर्वच खेळाडूंनी उत्तम खेळ केला.
-दादासो आव्हाड, महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक


नेमबाजी - महाराष्ट्राच्या सोनम मस्करला अंतिम फेरीत सहावा क्रमांक


महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या सोनम मस्करला सहावा क्रमांक मिळाला. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीत अजूनही महाराष्ट्राला पदक पटकावता आलेले नाही. सोनमला अंतिम फेरीत एकूण १६५.९ गुण मिळाले. सोनमने पात्रता फेरीत ६२८.१ गुण मिळवले. या स्पर्धेत सहभागी झालेली महाराष्ट्राची आणखी एक स्पर्धेक अनन्या नायडू (६२७.१ गुण) अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरली. या स्पर्धेत पश्चिम बंगालच्या मेहुली घोषला सुवर्ण, हरयाणाच्या नॅन्सीला रौप्य आणि बंगालच्या स्वाती चौधरीला कांस्यपदक मिळाले.