अहमदाबाद : भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या 16 वर्षीय तरुणाला रविवारी गुजरातमधील मुंद्रा येथे अटक करण्यात आलं. याबबातची माहिती स्वत: पोलिसांनी  दिली.


कच्छ (पश्चिम) पोलीस अधीक्षक सौरभ सिंह म्हणाले, काही दिवसांपूर्वी धोनीची पत्नी साक्षी धोनीच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या अश्‍लील धमकीसंदर्भात बारावीच्या विद्यार्थ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे."


आरोपीने धमकीचा संदेश दिल्याचं मान्य : पोलीस


पोलिसांनी सांगितले की, आयपीएलच्या मैदानात कोलकात्याविरुद्धचा सामना हरल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या पत्नीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मुलीला धमकी दिल्याचं 16 वर्षीय तरूणाने कबूल केलं आहे. पोलीस अधीक्षक सौरभ सिंह यांनी सांगितले की रांची पोलिसांनी या मुलाबद्दची माहिती कच्छ (पश्चिम) पोलिसांसोबत शेअर केलेली. आणि त्याने धमकी देणारे मेसेज पोस्ट केले आहेत की नाही याची सत्यता पडताळण्यास सांगितले.


रांची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यानंतर चौकशीदरम्यान इन्स्टाग्रामवर अश्‍लील धमकी पोस्ट करणारा हाच असल्याटे स्पष्ट झाले. हा आरोपी कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा येथे राहणारा आहे. तसेच त्याला रांची पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल. असे पोलीस अधीक्षक सौरभ सिंह यांनी सांगितले.


काय आहे प्रकरण


आयपीएलच्या मैदानात कोलकात्याविरुद्धचा सामना हरल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीसोबत विचित्र प्रकार घडला. एका ट्रोलरनं थेट धोनीच्या पत्नीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कमेंट करत त्याच्या 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. त्यावरुन अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा यांनी पंतप्रधान मोदींना सवाल केला होता. तर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्रोलर्सच्या या विकृत मानसिकतेकडे केंद्र सरकारनं लक्ष देण्याची गरज असल्याचं म्हटलंय.


कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जला 10 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सामन्यात फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. या सामन्यात धोनीला 12 बॉलमध्ये 11 धावा करता आल्या. त्यामुळे धोनीवर सातत्याने टीका केली जात आहे. परंतु काहींनी कळस गाठत धोनीची चिमुकली झिवा हिच्यावर बलात्काराची धमकी दिली.