लंडन : सलामीवीर ख्रिस गेल आणि निकोलस पूरन यांच्या धडाकेबाज खेळींच्या जोरावर वेस्ट विंडिजने विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला 7 गडी राखून धूळ चारली आहे. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले 106 धावांचे आव्हान वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी अवघ्या 13.4 षटकात पूर्ण केले.

तत्पूर्वी आज प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या फलंदाजांचा वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांच्या भेदक आक्रमणासमोर टिकाव लागला आहे. विडिंजच्या गोलंदाजांनी 105 धावांत पाकिस्तानी संघाचा खुर्दा उडवला. या सामन्यात पाकिस्तानला 22 षटकेही फलंदाजी करता आली नाही.

पाकिस्तानचा सलामीवीर फकर जमान आणि बाबर आझम या दोघांनी सर्वाधिक 22 (प्रत्येकी)धावा केल्या. पाकिस्तानच्या सहा फलंदाजांना दुहेरी धावसंख्यादेखील गाठता आली नाही. सुरुवातीपासून विंडिजच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांवर अंकुश ठेवला होता.

विंडिजच्या ओशाने थॉमस याने अवघ्या 27 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडले. तर कर्णधार जेसन होल्डरने तीन बळी घेतले. याशिवाय आंद्रे रसेलने दोन आणि शेल्डन कॉटरेलने एक बळी घेत सर्व पाकिस्तानी फलंदाजांना माघारी धाडले

पाकिस्तानचे 106 धावांचे अव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या विंडीजच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांना टी20 स्टाईल धुतले. ख्रिस गेलने पाकच्या गोलंदाजांचा समाचार घेत 34 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने 50 धावा केल्या. त्याला निकोलस पूरनने चांगली साथ दिली. पूरनने 19 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 34 धावा केल्या. पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरने विंडीजच्या 3 फलंदाजांना बाद केले.

दरम्यान, विश्वचषकाच्या आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यात वेगवान गोलंदाजांनी कमालीचे प्रदर्शन घडवले आहे. काल (गुरुवारी) इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर आणि आज वेस्ट इंडियन गोलंदाजांनी पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले.