मुंबई : राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातील साचलेपणा दूर करण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार मोठी पावलं उचलणार असल्याची माहिती मिळाली आहे. विधानसभेआधीच राष्ट्रवादीमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. पक्षात नवे बदल करण्यासाठी, विधानसभेसाठी पक्षाची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या (शनिवारी) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

स्वतः शरद पवारांनी उद्याची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचा लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव, आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी आणि अन्य विषयांवर चर्चा होणार आहे.

या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा होणार आहे. तसेच शरद पवार विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी दिल्ली येथे शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलीन होण्यासाठी हालचाली सुरु झाल्याची चर्चा सुरु होती. परंतु या सगळ्या अफवा खोट्या असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचं कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण होणार का? | माझा विशेष | ABP Majha 



राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला तर लोकसभा आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकते. काँग्रेसकडे सध्या केवळ 51 खासदारांचे संख्याबळ आहे. लोकसभेचे अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे किमान 55 खासदारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीकडे 5 खासदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काँग्रेमध्ये विलिन केल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांचे संख्याबळ 55 पेक्षा जास्त होईल, त्यामुळे त्यांना अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळवता येईल.