मुंबई : फुटबॉल आणि हॉकीच्या धर्तीवर आता क्रिकेटमध्येही रेड कार्ड दाखवलं जाऊ शकतं. जर कोणताही खेळाडू क्रिकेटच्या मैदानात नियम मोडेल, तर अंपायर त्यांना रेड कार्ड दाखवून निलंबित करु शकतो.


मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) वर्ल्ड क्रिकेट कमिटीने क्रिकेटमध्ये रेड कार्डचा समावेश करण्याची शिफारस केली आहे. याशिवाय बॅटचा आकार निश्चित करण्याचा सल्लाही दिली आहे. या समितीची पुढील बैठक 3 जुलै 2017 रोजी लॉर्ड्समध्ये होईल. जर आयसीसीने या शिफारशींना मंजुरी दिली तर त्यांचा क्रिकेटच्या नव्या कोडमध्ये समावेश होईल.

पुढील वर्षी ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता...

या शिफारशी पुढील वर्षी ऑक्टोबरपासून लागू होऊ शकतात. म्हणजेच पुढच्या वर्षी होणाऱ्या अॅशेस मालिकेत रेड कार्ड दिसू शकतं. एमसीसीच्या वर्ल्ड क्रिकेट कमेटीचे अध्यक्ष आणि इंग्लंडचे माजी कर्णधार माईक ब्रेयरली यांच्या नेतृत्त्वात मुंबईत बुधवारी झालेल्या बैठकीत, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप करण्याची आणि चार दिवसांच्या कसोटी सामन्यावरही चर्चा करण्यात आली. परंतु यावर सहमती होऊ शकली नाही.

ब्रेयरली म्हणाले की, "मैदानावर खेळाडूंची बेशिस्तपणा वाढत आहेत. यासाठी आम्ही रेड कार्डची शिफारस केली आहे. जर आमच्या शिफारशी मान्य झाल्या तर सर्व प्रथमश्रेणी आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात हा नियम लागू होईल. टी-20, वनडे आणि टेस्ट, या तिन्ही फॉरमॅटमध्ये रेड कार्डचा नियम लागू होईल. अंपायर रेड कार्डचा वापर करुन खेळाडूला संपूर्ण सामन्यासाठी बाहेर करु शकतात. यामुळे क्रिकेटमध्ये फारच बदल होईल. तसं पाहिलं तर आम्ही तात्पुरत्या निलंबनासाठी यलो कार्डबाबतही विचार केला होता. रेड कार्ड मोठ्या आणि गंभीर नियमांचं उल्लंघन केल्यावरच दाखवलं जाईल."

अंपायर या कारणांसाठी रेड कार्ड दाखवू शकतात

- खेळाडूंनी वारंवार बेशिस्तपण केल्यास
- अंपायरला धमकी किंवा त्यांच्यासोबत धक्काबुक्की केल्यास
- खेळाडू, अधिकारी किंवा विझिटर्स यांच्यासोबत हिंसा केल्यास
- खेळादरम्यान मैदानावर कोणत्याही प्रकारची हिंसक वर्तणूक केल्यास

बॅटचा आकार निश्चित करण्याचा सल्ला
याशिवाय एमसीसीने बॅट आणि चेंडू यांच्यात समन्वय राखण्यासाठी बॅटचा आकार निश्चित करण्याचा सल्लाही दिला. या समितीचा सदस्य रिकी पॉण्टिंग म्हणाला की, "आम्ही बॅटच्या कडेची जाडी 38 पासून 42 मिमी ठेवण्याचा विचार केला आहे. सध्या काही क्रिकेटच्या बॅटची जाडी 50 मिमीपेक्षा जास्त आहे. जगातील 60 टक्क्यांहून जास्त क्रिकेटर आमच्या मताशी सहमत आहेत.

2024 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाची आशा

- ब्रेयरली म्हणाले की, "2024 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होईल, अशी आशा आम्हाला आहे. आम्ही टी-20 फॉरमॅटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहोत.

आतापर्यंत केवळ एकदाच पॅरिस ऑलिम्पिक (1900) मध्ये क्रिकेटचा समावेश झाला होता.