मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता नोटबंदीचे परिणाम आणि निर्णयाच्या यशा-अपयशाविषयी चर्चांना उधाण आलं आहे.

नोटाबंदीमुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन 50 दिवस कळ काढा, असं आवाहन पंतप्रधानांनी देशभरातील नागरिकांना केलं होतं. आता सरकारकडे केवळ 22 दिवस शिल्लक आहेत.

सुट्ट्या पैशांच्या तुटवड्यामुळे नागरिक सध्या बेजार झाले आहेत. एटीएममधूनही बहुतांश वेळा दोन हजार रुपयांची नोट येत असल्याने राज्यापासून देशभरात सर्वत्र सुट्ट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

लोकांना त्यांचा पगार काढण्यासाठीही तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. अनेक बँकांमध्ये रोकड कमी असल्याने सरकाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षाही कमी रक्कम ग्राहकांच्या हातात पडत आहे.

तर दुसरीकडे एटीएम आणि बँकांसमोरही काही प्रमाणात रांगा कायम आहेत. तसंच काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारनं जो आटापिटा केला आहे, त्यालाही कितपत यश येईल याविषयी तज्ज्ञांमध्ये मतमतांतर आहेत.

नोटाबंदीबाबत महत्त्वाच्या बाबी -

  • आतापर्यंत 12 लाख कोटींचे 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा झाले आहेत.


 

  • रिझर्व्ह बँकेने सांगितलं की, आतापर्यंत बँकिंग सिस्टममध्ये 11 लाख 85 हजार कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.


 

  • यासोबत 3 लाख 81 हजार कोटी रुपये नागरिकांनी बँकांमधून काढले आहेत.


 

  • यामध्ये 1910 कोटी छोट्या नोटांचाही समावेश आहे.


 

  • बँकांमधून काढलेल्या पैशांमध्ये 2000 आणि 500 च्या नव्या नोटांची किंमत पावणे तीन लाख कोटी रुपये आहे.


 

  • लवकरच बाजारात  500 च्या नव्या नोटांचा पुरवठा आणखी वाढेल, असं सरकारने सांगितलं आहे.


 

  • एक हजार रुपयांच्या नव्या नोटा बाजारात येण्याची सध्या जोरदार चर्चा आहे. पण सरकारने त्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.


 

  • काल रिझर्व्ह बँकेने व्याज दरात कोणतीही कपात केली नाही. याचा अर्थ तुमचा हफ्ता जैसे थेच राहणार आहे.


 

विरोधक आज संसदेत काळा दिवस साजरा करणार
नोटाबंदीचा मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ होण्याची शक्यता आहे. सरकार आणि विरोधक नेत्यांमध्ये बुधवारी काल संवाद झाल. विरोधी पक्ष आज सकाळी पुन्हा एकदा बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवणार आहेत. तर नोटाबंदीचा एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विरोधक आज संसदेत काळा दिवस साजरा करणार आहे. विरोधी पक्षाचे खासदार काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त करणार आहेत.