पोर्ट एलिझाबेथ : दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज इम्रान ताहीरने भारतीय चाहत्यावर वंशभेदाचा आरोप केला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या वन डे सामन्यादरम्यान इम्रान ताहीर आणि चाहत्याची जोरदार शाब्दिक चकमक झाली. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने या संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरु केली आहे.


चौथ्या वन डेत इम्रान ताहीर अंतिम अकरा खेळाडूंमध्ये नव्हता. भारताचा या सामन्यात पाच विकेटने पराभव झाला. ''इम्रान ताहीर बाराव्या खेळाडूच्या भूमिकेत ड्रेसिंग रुममध्ये होता तेव्हा त्याच्यावर वंशभेदात्मक टिपण्णी करण्यात आली,'' असा दावा दक्षिण आफ्रिका संघाचे व्यवस्थापक मोहम्मद मूसाजी यांना केला.

''इम्रान ताहीरवर एका चाहत्याने संपूर्ण सामन्यादरम्यान वंशभेदात्मक टिपण्णी केली. ताहीरने ड्रेसिंग रुमसमोरील सुरक्षा रक्षकाला याची माहितीही दिली. सुरक्षा रक्षक त्या टिपण्णी करणाऱ्या व्यक्तीकडेही जाऊन आला,'' अशी माहिती मूसाजी यांनी दिली.

इम्रान ताहीरने दिलेल्या माहितीनुसार, ''तो भारतीय चाहता होता. या सर्व घटनेची क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने चौकशी सुरु केली आहे,'' अशी माहिती मूसाजी यांनी दिली.

''ताहीर त्या चाहत्याकडे गेला तेव्हा त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. परिस्थिती निवळण्यासाठी त्याला तिथून ड्रेसिंग रुममध्ये नेण्यात आलं,'' असंही मूसाजी यांनी सांगितलं. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

''इम्रान ताहीरवर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही, कारण त्याने दिलेलं स्पष्टीकरण मान्य करण्यात आलं आहे. घटनेदरम्यान कोणतीही हाणामारी झाली नाही, ज्याचा दावा व्हायरल व्हिडीओमध्ये करण्यात येत आहे,'' असं मूसाजी यांनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ :