मुंबई : ऑस्ट्रेलिया संघाविरोधात काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या क्रिकेट मालिकेमध्ये भारतीय संघानं दमदार विजय मिळवला होता. ज्यानंतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी आणि टी नटराजन या खेळाडूंना SUV ही गाडी भेट स्वरुपात देणार असल्याचं जाहीर केलं होतं. 


संघातील युवा खेळाडूंचं कौतुक करण्यासाठी म्हणून आनंद महिंद्रा यांनी या मार्गाची निवड केली. ज्यानंतर आता टी नटराजन या खेळाडूच्या हाती ही अतिशय खास अशी भेट पोहोचली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानं आपल्याला ही भेट मिळाल्याबाबतची एक पोस्ट लिहिली. आपल्या प्रवासाची दखल घेतल्याबद्दल नटराजन यानं आनंद महिंद्रा यांचे आभार मानले. इतकंच नव्हे, तर भेट स्वरुपात त्यांना गाबा येथील कसोटीदरम्यानची संस्मरणीय जर्सी एक लहानशी आठवण भेट म्हणून दिली. 


IPL 2021Viral Video |  राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडू रुमचा कॅमेरा बंद करायला विसरला अन्...  










जानेवारी महिन्यात आनंद महिंद्रा यांनी खेळाडूंच्या नावे ही अनोखी भेट देणार असल्याची ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं होतं. 'सहा युवा खेळाडूंनी या ऐतिहसिक मालिकेतून संघात पदार्पण केलं. येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वप्न पाहणं त्यांनी शक्य करुन दाखवत अशक्यही शक्य करण्याची पात्रता दाखवून दिली', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं. एसयूव्ही भेट देण्यामागचं कारण म्हणजे या तरुण पिढीचा स्वत:वर असणारा विश्वास आणि यातूनच त्यांनी वेगळ्या वळणवाटा निवडाव्यात यासाठीचं प्रोत्साहन..., असं म्हणत आनंद महिंद्रा यांनी या खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती.