मुंबई : गंभीर अवस्थेत पोहोचलेल्या ‘व्हेरिकोज व्हेन्स’ या पायांच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या 17 वर्षीय तरूणावर मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहे. या रूग्णालयातील प्रमुख वरिष्ठ सल्लागार व्हेरिकोज व्हेन्स विशेषज्ञ डॉ. हिमांशू शहा यांच्या अध्यक्षतेखाली अन्य डॉक्टरांच्या टीमने लेझर शस्त्रक्रियेद्वारे रूग्णावर यशस्वी उपचार केले आहेत. या शस्त्रक्रियेनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी रूग्णाला घरी सोडण्यात आले. आता या तरूणाची प्रकृती उत्तम असून तो पुन्हा आपले दैनंदिन कामे करू लागला आहे.
 
सांताक्रुझमध्ये राहणारा वर्षील शहा (17) हा महाविद्यालयात शिकतोय. या तरूणाला जास्त वेळ एकाच जागी बसायला किंवा उभं राहायला त्रास जाणवत होतो. ऑनलाईन अभ्यासही तो करू शकत नव्हता. स्वतःची दैनंदिन कामे करायला देखील इतरांवर अवलंबून रहावे लागत होते. पण, वोक्हार्ट रूग्णालयात झालेल्या उपचारानंतर आता तो पुन्हा चालू लागला आहे. पाय दुखणे, थकवा आणि असाह्य वेदनेतून आता त्याची सुटका झाली आहे.


मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील प्रमुख वरिष्ठ सल्लागार व्हेरिकोज व्हेन्स विशेषज्ञ डॉ. हिमांशू शहा यांनी सांगितले की, “या तरूणावर उपचार सुरू करण्यापूर्वी ‘डॉपलर स्कॅन’ ही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या वैद्यकीय चाचणीत तरुणाच्या दोन्ही पायात व्हेरिकोज व्हेन्सची समस्या असल्याचे निदान झाले. मुख्यतः हा पायांना होणार आजार आहे. या आजारात पाय सुजणे, पायात वेदना जाणवणे, पायाच्या पोटऱ्या दुखणे, थकवा येणं, निसांचा रस निळा पडणे ही प्रमुख लक्षणे दिसतात. मुलांमध्ये ही समस्या आढळून येण्यामागे अनुवांशिकता हे कारण असू शकते. गेल्या काही वर्षांपासून मी 18-25 या वयोगटातील जवळजवळ 100 तरुणांच्या यशस्वीरित्या उपचार केले आहे.’’


डॉ. हिमांशू शहा पुढे म्हणाले, “या रूग्णाच्या प्रकरणात पायाच्या नसांच्या बाजूला अनेक अतिरिक्त नसा होत्या. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होत नव्हता. नसांमधून रक्तस्त्राव होत असल्याने लेझर शस्त्रक्रिया करण्यात आली. साधारणतः दीड तास शस्त्रक्रिया सुरू होती. त्यानंतर रूग्णाला सर्वसामान्य वॉर्डमध्ये हलविण्यात आले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी घरी सोडण्यात आले.’’


‘व्हेरिकोज व्हेन्स’ची ही समस्या टाळण्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. दररोज चालण्याचा व्यायाम केल्यास पायातील नसांमध्ये रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होतो. याशिवाय वजनावर नियंत्रण ठेवणे, जास्त वेळ एकाच जागी उभं राहणे अथवा बसून राहणे टाळावेत. उंच टाचेच्या चपलेचा नियमित वापर करू नये आणि योग्य आहाराचे सेवन करणे, यामुळे व्हेरिकोज व्हेन्स या आजारापासून स्वतःला दूर ठेवता येऊ शकते. 


वर्षील शहा म्हणाला की, ‘‘पायाच्या असह्य वेदनामुळे मी अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकत नव्हतो. मी दिवसभर अंथरूणावर झोपून असायचो. परंतु, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आता मी पुन्हा पूर्वीप्रमाणे आयुष्य जगू लागलो आहे. आता मी परत व्यायाम करायला सुरूवात केली आहे.’’