Ranji Trophy Return : कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून न होऊ शकलेल्या देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या रणजी करंडक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. कोरोनाचे संकट पाहता ही स्पर्धा जैव-सुरक्षित वातावरणात होणार आहे. याबाबत ट्वीट करत बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) म्हणाले की, पडद्याआड बरेच प्रयत्न केल्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटला (रणजी करंडक स्पर्धेला) रुळावर आणले गेले आहे. 


जय शाह यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, भारतीय क्रिकेटमधील देशांतर्गत स्पर्धा असलेल्या रणजी करंडक स्पर्धेचं आज पुनरागमन होत आहे. या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो. प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी पडद्याआड बरेच प्रयत्न केले गेले असल्याचे ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. 






अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा आमनेसामने 


कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेमुळे देशातील प्रमुख देशांतर्गत स्पर्धा यंदाही रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु संसर्ग कमी झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत 38 संघ सहभागी होणार असून सर्वांच्या नजरा गतविजेता सौराष्ट्र आणि 41 वेळचा विजेता ठरलेल्या मुंबई यांच्यातील सामन्यावर असतील, ज्यात अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आमनेसामने असतील. 


देशातील 9 क्रिकेट मैदानांवर तयार करण्यात आले बायो-बबल  


ही स्पर्धा देशातील 9 ठिकाणी खेळली जाणार असून तेथे 9 बायो-बबल तयार करण्यात आले आहेत. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या फेरीच्या सामन्यांपूर्वी खेळाडूंना 5 दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागल्याने त्यांना फक्त दोन दिवस सरावाचा वेळ मिळाला होता. मात्र खेळाडू तक्रार करण्याच्या मनस्थितीत नाहीत. दोन मोसम मर्यादित षटकांमध्ये खेळल्यानंतर अखेर त्याला सर्वात आव्हानात्मक फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळत असल्याचा खेळाडूंना आनंद आहे.


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha