नवी दिल्ली : चीनच्या हांगझूमध्ये 2022 साली होणाऱ्या एशियाडमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता आहे. आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या बैठकीत 2022 सालच्या एशियाड खेळांच्या यादीत क्रिकेटला स्थान देण्यात आलं आहे. 2010 सालच्या ग्वांगझू आणि 2014 च्या इंचिऑन एशियाडमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पण गेल्या वर्षी (2018) जकार्ता एशियाडमधून क्रिकेटला वगळण्यात आलं होतं. त्यामुळे 2014 नंतर पुन्हा एकदा एशियाडमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे.
T20 फॉरमॅट क्रिकेटचा (महिला-पुरुष) 2022 च्या एशियाडमध्ये समावेश करण्यात आला आहे. आता भारतीय ऑलिम्पिक संघ याबाबत बीसीसीआयला पत्र लिहिणार आहे. मात्र भारतीय क्रिकेट संघ या खेळांमध्ये सहभाग घेणार की नाही, याबाबत बीसीसीआयकडून स्पष्टीकरण अजून आलेलं नाही. याआधी संघाच्या व्यस्त वेळापत्रकाचा हवाला देत भारत एशियाडमधून बाहेर राहिला होता. 2010 आणि 2014 च्या एशियाडमध्ये क्रिकेटचा समावेश झाला होता, पण त्यावेळी बीसीसीआयने बिझी शेड्यूल असल्याचं सांगत संघांना पाठवलं नव्हतं.
एशियाड खेळांच्या आयोजनासाठी आणखी बराच वेळ आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारताच्या प्रतिनिधित्वाबाबत चर्चा करण्यासाठी बीसीसीआयला बराच वेळ मिळेल. भारत वगळता श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान या नियमित क्रिकेट खेळणाऱ्या देशांनी एशियाडमध्ये सहभाग नोंदवला आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानने 2014 मध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात सुवर्ण पदक जिंकलं होतं, तर 2010 मध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानने बाजी मारली होती.