नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक क्रिडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत तर अनेक रद्द करण्यात आल्या आहेत. यादरम्यान, क्रिकेट, फुटबॉल आणि बास्केटबॉलच्या सर्व महत्त्वाच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. आता या यादीत आता बुद्धिबळाचाही समावेश झाला आहे. बुंडेसलीगा चेसमध्ये पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेला विश्वनाथन आनंद जो एससी बॅडेनसाठी खेळत होता, तो सध्या जर्मनीमध्ये असून आता हा इव्हेंटही कॅन्सल करण्यात आला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आनंदला भारतात परतण्यात अडचणी येत आहेत. आज आनंद भारतात परतणं अपेक्षित होतं. मात्र भारतासह जगभरातील वाढता प्रादुर्भाव पाहता विश्वनाथन आनंद यांनी जर्मनीतच राहणं पसंत केलं आहे.


सोमवारी विश्वनाथन जर्मनीवरून घरी परतणार होता, परंतु आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्याला जर्मनीतच थांबावं लागणार आहे. अशातच एक आठवडा आधी तो सेल्फ आयसोलेशनमध्ये गेला आहे. भारतात असलेल्या त्याच्या पत्नीने एबीपी न्यूजशी बोलताना चिंता व्यक्त केली आहे.


विश्वनाथनच्या पत्नीने बोलताना सांगितले की, 'मला फार भीती वाटत आहे की, तो तिकडे आहे. परंतु, मला याहीगोष्टीचा आनंद आहे की, त्यांची प्रकृती उत्तम आहे. मी फक्त प्रार्थना करत आहे की, या महिना अखेरपर्यंत त्यांनी भारतात परत यावं.' सध्या आनंदला आपल्या कुटुंबाची आठवण येत आहे. तसेच जर्मनीतून आनंद इंटरनेटमार्फत मित्र आणि कुटुंबियांसोबत चॅट करत आहे. एवढचं नाहीतर आपला मुलगा आणि पत्नीसोबत तो व्हिडीओ कॉलवरही संपर्कात आहे.


दरम्यान, जगभरात आतापर्यंत 6515 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 157 देशांमध्ये 1 लाख 69 हजार 500 एवढी कोरोनाबाधितांची संख्या आहे. कोरोना व्हायरसमुळे चीननंतर इटलीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. इटलीमध्ये कोरोनामुळे मागील 24 तासांमध्ये 368 जणांचा मृत्यूल झाला आहे. तसेच चीनमध्ये मागील 24 तासांमध्ये फक्त 14 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये जरी कोरोनाचा कहर कमी होत असेल तरी इटलीमध्ये मात्र कोरोनामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत आहे.