पणजी : गोव्याचे विद्यमान आणि जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यपालांकडे काहीच काम नसतं असतं, असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जे राज्यपाल असतात ते दारू पितात आणि गोल्फ खेळतात, असा खळबळजनक दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे.


सत्यपाल मलिक उत्तर प्रदेशमधील बागपतच्या दौऱ्यावर होते. याठिकाणी सभेला संबोधित करताना सत्यपाल मलिक यांनी म्हटलं की, राज्यपालांना काही विशेष काम नसतं. जम्मू काश्मीरमधील राज्यपाल तर दारु पितात आणि गोल्फ खेळण्यात व्यस्त असतात. इतर ठिकाणीही राज्यपाल आरामात राहतात आणि कोणत्या वादात पडत नाहीत.


बागपतमध्ये बोलताना त्यांनी बिहारमध्ये शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाचाही उल्लेख केला. बिहारचे राज्यपाल असताना राज्यात 100 कॉलेज राजकीय नेत्यांचे होते. या कॉलेजमध्ये एक शिक्षकही नव्हता. दरवर्षी गैरमार्गाने पैसे घेऊन परीक्षा घेतल्या जात होत्या आणि पदव्याचं वाटप होतं होतं. मात्र ते सर्व कॉलेज मी बंद पाडले आणि एक केंद्रीय परीक्षा प्रणाली विकसित केली, असं सत्यपाल मलिक यांनी सांगितलं.





जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी सत्यपाल मलिक जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. अशा महत्त्वाच्या क्षणी प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राज्यपाल म्हणून सत्यपाल मलिक यांच्याकडे होती. सत्यपाल मलिक यांच्याच कार्यकाळात जम्मू काश्मीर आणि लडाख असे भाग करण्यात आले होते.


सत्यपाल मलिका यांची 3 नोव्हेंबर 2019 ला गोव्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली होती. गोव्याच्या राज्यपालपदाची शपथ घेताना त्यांनी म्हटलं होतं की, जम्मू काश्मीरने अनेक समस्या होत्या, मात्र आम्ही त्याचा यशस्वीपणे सामना केला आणि राज्यातील जवळपास सर्व समस्या दूर केल्या.