नवी दिल्ली : प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. नोवाक जोकोविचने सोमवारी आपली कोविड 19 टेस्ट केली होती, ती पॉझिटिव्ह आली आहे. जोकेविचशिवाय त्याची पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जोकोविचच्या मुलांची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे.


नोवाकने सर्बिया आणि क्रोएशिया येथील स्पर्धेत सहभाग घेतला होता. या टूरमध्ये सहभागी झालेल्या अनेक खेळाडूंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्याआधी कोरोनाच्या काळात एड्रिया टूरमध्ये सहभाग घेण्यावरून जोकोविचवर टीका होत होती. ब्रिटनच्या डेन इवांसने जोकोविचवर निशाणा साधला होता. जोकोविचने ग्रिगोर दिमित्रोव्ह आणि बोर्ना कॉरिक यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जबाबदारीने वागणं गरजेचं होतं. या दोन्ही खेळाडूंना या टूरदरम्यान कोरोनाची लागण झाली होती.


सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये जोकोविच मरिन चिलिच आणि अलेक्झांडर ज्वेरेव्हसोबत बास्केटबॉल खेळताना दिसत होता. याशिवाय जोकोविच कोरिकच्या गळ्यात हात घालताना दिसत होता.


एड्रिया टूरच्या पहिल्या टप्प्याचं विजेतेपद ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमने जिंकले होते. पहिला टप्पा सर्बियातील बेलग्रेडमध्ये खेळला गेला होता. यामध्ये चार हजार प्रेक्षक सहभागी झाले होते. त्यानंतर बेलग्रेडच्या नाईटक्लबमध्ये खेळाडू पार्टी करताना आणि नाचताना दिसले.


जोकोविच आधी क्रीडा विश्वातील अनेक बड्या खेळाडूंना कोरोना लागण झालेली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघातील दहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी शादाब खान, हैदर अली आणि हारीस रौफत्या यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आज फखर झमान, इमरान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वहाब रियाज या सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याआधी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि बांगलादेशचा माजी कर्णधार मशराफी मुर्तझा हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.


संबंधित बातम्या


पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन शाहिदी आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह