नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेक धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली आहे. जगप्रसिद्ध अशा हज यात्रेवरही त्याचं सावट आहे. त्यामुळेच यावेळी सौदी अरेबियानं बाहेरच्या देशांतून येणाऱ्या यात्रेकरुंना मनाई केली आहे. त्यामुळे तब्बल 90 वर्षानंतर हज यात्रेवर असे निर्बंध लावण्याची वेळ आली आहे.


हज यात्रेलाही कोरोनाचा फटका बसला आहे. 1932 नंतर पहिल्यांदाच यात्रेवर निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. सिमीत यात्रेकरुंसह हज यात्रा पार पडणार आहे. ज्या निर्णयाकडे जगभरातल्या मुस्लीम यात्रेकरुंचं लक्ष लागलेलं होतं. तो निर्णय अखेर सौदी अरेबियानं जाहीर केला. हज यात्रेसाठी बाहेरुन येणाऱ्या लोकांसाठी यावेळी बंदी घालण्यात आलीय. या यात्रेसाठी यावेळी भारतातून 2 लाख 30 हजार यात्रेकरुंनी बुकिंग केलं होतं. या सगळ्यांचे पैसे कुठल्याही चार्जविना परत करणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे.


यावर्षी 28 जुलै ते 2 ऑगस्टच्या दरम्यान हजची यात्रा होणार होती. दरवर्षी साधारण 20 ते 25 लाख विदेशी यात्रेकरु हजच्या यात्रेला येत असतात. मात्र यावेळी कोरोना संकटामुळे यात्रेवर पहिल्यापासूनच अनिश्चिततेचं सावट होतं. यात्रेच्या अवघ्या 5 आठवडे आधी सौदी अरेबिया किंगडमनं हा निर्णय जाहीर केलाय. सौदीमध्ये बाहेरच्या लोकांना कोरोना काळात मिळणार की नाही याचा निर्णय लवकर होत नव्हता. त्यामुळे यात्रेकरुंमध्ये संभ्रम होता. पण भारत सरकारने याआधीच ज्यांना पैसे परत हवेत त्यांना ते देण्याची व्यवस्था केली होती. आता तर बाहेरच्या यात्रेकरुंवर बंदी असल्यानं सगळ्यांचेच पैसे परत मिळणार आहेत.


मागच्या वर्षी हजला 25 लाख मुस्लीम बांधवांनी हजेरी लावली होती. प्रत्येक देशाचा कोटा ठरलेला आहे. त्यानुसार तितक्या लोकांना परवानगी मिळते. जगात सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाचा कोटा सर्वाधिक आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक भारताचाच लागतो. तब्बल 90 वर्षानंतर हजच्या यात्रेवर आता निर्बंध लागलेत. 18 व्या शतकातही कधी मोठ्या साथींमुळे, कधी युद्धामुळे ही यात्रा रद्द करावी लागली होती. यावेळी यात्रा पूर्णपणे रद्द झालेली नाही. सौदी अरेबियातलेच लोक यात्रेत यावेळी सहभागी होऊ शकणार आहेत.


इतर देशांप्रमाणे सौदी अरेबियातही सध्या कोरानाचा प्रादुर्भाव वाढतोय. सौदीमध्ये 1 लाख 65 हजार कोरोना बाधित आहेत. तर 1300 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून यात्रेवर प्रतिबंध जाहीर केले आहेत.


Haj Yatra 2020 Cancelled | मुस्लीम नागरिकांना हज यात्रेला जाता येणार नाही; केंद्र सरकारचा निर्णय