मुंबई: आयसीसी आणि बीसीसीआयमध्ये महसूल वाटून घेण्याच्या पद्धतीवरून सुरू असलेला वाद अजूनही मिटू शकलेला नाही.

या प्रकरणात आयसीसीनं दिलेली 10 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या अतिरिक्त वाटणीची ऑफरही बीसीसीआयनं धुडकावून लावली आहे. आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी नव्या आर्थिक मॉडेलनुसार बीसीसीआयला 10 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या अतिरिक्त वाटणीची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ती ऑफर स्वीकारायची की नाही, हे ठरवण्यासाठी आयसीसीनं बीसीसीआयला विशिष्ट मुदतही दिली आहे. पण त्या ऑफरचा विचारही आपण करणार नसल्यानं आयसीसीशी बोलणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केलं.

आयसीसीच्या सध्याच्या महसूल वाटपाच्या पद्धतीनुसार बीसीसीआयला अंदाजे 58 कोटी अमेरिकन डॉलर्सची वाटणी मिळते. पण आयसीसीची ऑफर स्वीकारल्यास, बीसीसीआयला 29 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या वाट्यावर समाधान मानावं लागेल.