नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय स्पर्धा आयोगाने बीसीसीआयला 52 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. भारतीय स्पर्धा आयोग ही भारत सरकारच्या अंतर्गत येणारी संस्था आहे.
भारतीय स्पर्धा आयोगाने बुधवारी 44 पानांचा निकाल दिला. यात बीसीसीआयला 52.24 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बीसीसीआयच्या गेल्या तीन वर्षांमधील आर्थिक उलाढालीच्या आधारे हा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड तीन वर्षातील टर्नओव्हरच्या 4.48 टक्के इतका आहे.
बीसीसीआयने तीन आर्थिक वर्षांमध्ये 2013-14, 2014-15 आणि 2015-16 मध्ये सरासरी कमाई 1164.7 कोटी रुपये होती. आयपीएलने प्रक्षेपण हक्काच्या लिलाव प्रक्रियेत आर्थिक हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका स्पर्धा आयोगाने ठेवला आहे.
यापूर्वी फेब्रुवारी 2013 मध्येही बीसीसीआयला 52.24 लाखांचा दंड आकारण्यात आला होता.
भारतीय स्पर्धा आयोगाने बीसीसीआयला 60 दिवसात उत्तर देण्याची सूचना केली आहे. तसंच या प्रकरणी जारी केलेल्या निर्देशांवर एक अहवालही दाखल करण्यास सांगितलं आहे.