CWG 2018 : 18 वर्षांच्या दीपक लाथरला कांस्यपदक
एबीपी माझा वेब टीम | 06 Apr 2018 03:09 PM (IST)
तसंच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचं हे चौथं पदक ठरलं. ही चारही पदकं वेटलिफ्टर्सनी मिळवली आहेत.
मेलबर्न : ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टर दीपक लाथरने भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली आहे. दीपकने पुरुषांच्या 69 किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली. दीपकने स्नॅचमध्ये 136 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 159 किलो असं मिळून 295 किलो वजन उचललं. ही कामगिरी त्याला कांस्यपदक मिळवून देणारी ठरली. हरियाणाच्या दीपक लाथरने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी मिळवलेलं हे यश कौतुकास्पद मानण्यात येत आहे. तसंच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचं हे चौथं पदक ठरलं. ही चारही पदकं वेटलिफ्टर्सनी मिळवली आहेत. पहिल्या दिवशी मीराबाई चानूने सुवर्ण आणि गुरु राजाने रौप्यपदकाची कमाई केली होती. तर संजिता चानूने महिला वेटलिफ्टिंगच्या 53 किलो वजनी गटात भारतासाठी दुसरं सुवर्ण मिळवलं.