मुंबई : 20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं. शिक्षा सुनावल्यानंतर सलमान खानची जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. सलमानने गुरुवारची रात्री तुरुंगात काढली.


सलमान खानला झालेल्या शिक्षेमुळे बॉलिवूडला धक्का बसला आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी सलमानच्या शिक्षेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर ‘बागी 2’ च्या दमदार कमाईनंतर आयोजित केलेली सक्सेस पार्टीही रद्द करण्यात आली.

मात्र या दरम्यानच अभिनेत्री सोफिया हयातने सलमानच्या तुरुंगवासावर आनंद व्यक्त केला आहे. सोफियाने या संदर्भात इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.



तिने लिहिलं आहे की, "अखेर तुमचं कर्म तुम्हाला शिक्षा देतंच. बहुतांश लोक सलमानविरोधात बोलण्यास घाबरतात. कारण त्यांना वाटतं की तो बॉलिवूडला कंट्रोल करतो. पण मी बोलायला घाबरत नाही. मला आनंद आहे की, जे काम सलमानने केलं त्यासाठी त्याला जेलमध्ये जावं लागलं.

पृथ्वीवर जनावरं गरजेची आहेत आणि सलमानने हे चुकीचं काम करताना केवळ स्वत:बद्दल विचार केला. लाखो लोक सलमानला फॉलो करतात. त्यामुळे तरुणाईप्रती त्याची जबाबदारी आहे. अशी कामं करुन तो जगाला काय दाखवू इच्छितो. सलमान तरुणांसमोर काय आदर्श ठेवत आहे? कायदा मोडून जनावरांना मारणं आणि मग स्वत:ला वाचवणं, का तर तो एक सेलिब्रिटी आहे म्हणून?

एखाद्या पाश्चिमात्य देशात जर सलमानने ड्रिंक अँड ड्राईव्ह करुन कोणाला मारलं असतं तर त्याला अपमानित केलं असतं. आपल्या कर्माचं प्रायश्चित्त करण्यासाठी तो सामाजिक कार्य करुन स्वत:ला दानशूर, दयाळू व्यक्ती असल्याचं दाखवत आहे.

“तुम्ही कोणीही का असेना, तुम्ही कायद्याशिवाय मोठं नाही हेच भारताने दाखवून दिलं आहे. मी अनेक तरुणांकडून ऐकलंय की, बरेच लोक गुन्हेगारांची पोलिसात तक्रार करण्यास घाबरतात. कारण ते टीव्हीमध्ये पाहतात की, पॉवरफुल लोक पोलिस, न्यायाधीश आणि वकिलांना पैसे देऊन स्वत:ची सुटका करतात.  

माझ्यासोबतही असं झालं आहे. अरमान कोहलीने माझ्या दोन वकिलांना विकत घेतलं आणि त्यामुळे मी माझी केस लढू शकले नाही. डॉली बिंद्रानेही मला सांगितलं की, अरमान मलिकचं कुटुंब पॉवरफुल आहे. ते विमानतळावर माझ्या बॅगमध्ये ड्रग्जही ठेवू शकतात, जेणेकरुन मला तुरुंगवास होऊ शकते. यामुळे मला माघार घ्यावी लागली. मी ज्या वकिलांची नेमणूक केली होती, त्यांना पैसे देऊन खरेदी केलं.

आज, हिंदुस्थान मजबूत होत आहे आणि जगाला अभिमानाने मान उंचावून सांगू शकत आहे की, भारतात न्याय मिळतो. आज गरिबांना आशा वाटतेय की, जे कायद्याची थट्टा करतात, त्यांच्याविरोधात ते न्यायासाठी लढू शकतात. आज मी बोलू शकते, हिंदुस्थान झिंदाबाद"