नाशिक: नाशिक महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 (क) च्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.
महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा दिला आहे. त्यामुळे शिवसेना, मनसे आणि भाजप या प्रमुख पक्षामध्ये तिरंगी लढत आहे.
मनसेच्या नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्यासाठी आज पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी मनसेने भोसले यांच्या घरातच वैशाली भोसले यांना उमेदवारी दिली.
तर शिवसेनेने मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या स्नेहल चव्हाण आणि भाजपने विजया लोणारी यांना उमेदवारी तिकीट दिलं आहे.
पोटनिवडणुकीसाठी 47 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 24 हजार 140 पुरुष तर 23 हजार 88 स्त्री मतदार आहे. मतदानासाठी 61 बूथ उभारण्यात आले आहेत.
शनिवारी सकाळी साडेदहा वाजता मतमोजणी होणार आहे. ही मनसेसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. तर शिवसेना, भाजपला आपली सदस्य संख्या एका जागेने वाढविण्याची संधी चालून आली आहे. यात कोण बाजी मारतो हे उद्या स्पष्ट होईल.