लंडन : इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाच्या अतिशय वाईट कामगिरीवरुन क्रिकेट चाहते मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ट्रोल करत आहेत. भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर वनडे आणि कसोटी मालिका गमावली. आता कसोटी मालिकेतील अखेरचा सामना गमावण्याचं संकट टीम इंडियावर ओढावलं आहे. भारतीय संघाच्या सुमार कामगिरीवर नाराज टीम इंडियाचे चाहते प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर राग व्यक्त करत आहेत. मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी पुन्हा एक फ्लॉप सिद्ध झाली आहे.


इंग्लंडने सामन्याच्या चौथ्या दिवशी चहापानानंतर काही वेळातच आठ विकेट्सच्या मोबदल्यात 423 धावा बनवून डाव घोषित केला. इंग्लंडने भारतासमोरा विजयासाठी 464 धावांचं लक्ष्य ठेवलं. याच्या प्रत्युत्तरादाखल भारतने आपल्या तीन मोठ्या विकेट्स फक्त दोन धावांच्या मोबदल्यात गमावले. पहिल्यांदा शिखर धवन, मग चेतेश्वर पुजारा आणि नंतर विराट कोहली शून्यावर बाद झाला. चाहते संघाच्या या कामगिरीवर अतिशय नाराज आहेत.

संतापलेल्या अनेक चाहत्यांनी रवी शास्त्रींना विजय माल्यासह तिथेच (इंग्लंड) राहण्याचा सल्ला दिला. तर शास्त्री लवकरच कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंट्री करताना दिसतील, असं कॉमेडियन सुरेश मेनन यांनी म्हटलं आहे.




विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांनी रवी शास्त्रींना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली आहे, असं एकाने लिहिलं आहे. अनेकांनी भारतीय फलंदाजांचीही थट्टा केली. जगातील सर्वात उत्तम फलंदाज कोण आहे, शिखर धवन की हार्दिक पटेल? असा एका युझरने लिहिलं आहे.








बीसीसीआयने खेळाडूंसह प्रशिक्षकांना अॅडव्हान्स सॅलरी दिली आहे. 18 जुलै पासून 17 ऑक्टोबर 2018 पर्यंत संघासोबत राहण्यासाठी आणि खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी रवी शास्त्री यांना अॅडवान्समध्ये 2.5 कोटी रुपये दिले आहेत. शास्त्रींना वर्षाला 8 कोटी रुपये मिळतात.