मुंबई : सलमान खानचा सुपरहिट दंबग सिनेमाच्या सीरिजचा तिसरा सिनेमा 'दंबग-3' पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. सलमान खानने काल ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. सलमानने अनोख्या अंदाजामध्ये या सिनेमाची घोषणा केली. आठ वर्षापूर्वी कालच्याच दिवशी 'दंबग' सिनेमा रिलीज झाला होता.

सलमानने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, "दंबग सिनेमाला आज आठ वर्ष झाली. तुमचं प्रेम आणि कौतुक याबद्दल रज्जो आणि चुलबुल पांडेकडून सर्वांचे आभार. दबंग-3मध्ये पुढच्या वर्षी भेटुया."


सलमानच्या ट्वीट आधीही दंबग-3 सिनेमाबद्दल अनेक चर्चा होत्या. सलमान खान 'भारत' आणि 'दबंग-3' सिनेमाचं शुटिंग एकत्र करणार असल्याचही बोललं जात होतं. तसेच सप्टेंबर महिन्यात दबंग-3चं शुटिंग सुरू होणार असल्याचीही माहिती होती. मात्र सलमानच्या घोषणेनंतर सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

सोनाक्षीने दंबग-3 सिनेमाच्या शुटिंगबाबत याआधी माहिती दिली होती. या वर्षाच्या अखेरपर्यंत सिनेमाचं काम सुरू होईल. प्रभू देवा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून मी पुन्हा या सिनेमाचा भाग होण्यासाठी उत्सुक आहे, असं सोनाक्षीने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.

तसेच चुलबुल रज्जोशिवाय अधुरा असल्याचंही सोनाक्षीने म्हटलं होतं. त्यामुळे दबंग-3 सिनेमा नक्की करणार असल्याचं सोनाक्षीने सांगितलं होतं. दंबग सिनेमा 2010मध्ये तर दंबग-2 सिनेमा 2012मध्ये प्रदर्शिद झाला होता. त्यामुळे आता जवळपास 7 वर्षांनी दबंग सीरिजचा तिसरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे निश्चित झालं आहे.