मुंबई: वि.वा.शिरवाडकर लिखित नटसम्राट हे नाटक कमालीचं गाजलं. गणपतराव बेलवलकरांची भूमिका साकराणं हे खायचं काम नव्हतं. म्हणूनच भल्याभल्या कलाकारांना नटसम्राट साकारण्याची भुरळ पडली. आजही ती कायम आहे. आजवर यशवंत दत्त, सतीश दुभाषी, दत्ता भट, श्रीराम लागू, उपेंद्र दाते आदींनी हा गणपतराव साकारला. या नाट्यकृतीचा मोह झाल्यानंतर महेश मांजरेकर यांनीही या नाटकाला चंदेरी पडद्यावर आणलं. त्यावेळी नाना पाटेकर यांनी ही भूमिका साकारली. आता पुन्हा एकदा हे नाटक रंगमंचावर येणार आहे. विशेष बात अशी, की हॅम्लेट, अलबत्या गलबत्या या नाटकांच्या यशानंतर झी मराठी हे नाटक मंचावर आणणार आहे.
सध्या या नाटकाची तालीम सुरु असून रंगभूमीवर गणपतरावांची भूमिका कोण करणार याकडे रसिकांचं लक्ष लागलं आहे. एबीपी माझाला मिळालेल्या विशेष बातमीनुसार ही भूमिका वठवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे अभिनेते मोहन जोशी यांच्याकडे. विष्णूदास भावे पदक मिळालेले ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी या भूमिकेला न्याय देतील अशी खात्री रंगकर्मींना वाटते. तर कावेरी यांची भूमिका साकारणार आहेत, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी. नाटकाच्या तालमींना सुरुवात झाली असून, नोव्हेंबरच्या 4 तारखेला हे नाटक रंगभूमीवर आणण्याचा मानस निर्मात्यांचा आहे.
झी मराठीने यापूर्वी अष्टविनायक, जिगीषा, अद्वैत या नाट्यसंस्थांना हाताशी धरुन हॅम्लेट, अलबत्या गलबत्या ही नाटकं दिली. रसिकांनी ती तुफान उचलून धरली. आता अरण्यक हे नाटकही नव्याने रंगभूमीवर येतं आहे. त्यात दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत आहेत. या नाटकासह नटसम्राट हे नाटकही रंगभूमीवर आल्यानंतर हा समूह एकूण चार नाटकं नाट्यसृष्टीत चालवेल.
नटसम्राट पुन्हा रंगभूमीवर अवतरणार, गणपतराव कोण साकारणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Sep 2018 10:19 AM (IST)
आता पुन्हा एकदा नटसम्राट हे नाटक रंगमंचावर येणार आहे. विशेष बात अशी, की हॅम्लेट, अलबत्या गलबत्या या नाटकांच्या यशानंतर झी मराठी हे नाटक मंचावर आणणार आहे.
Photo-Youtube Marathi Gaurav
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -