जमैका : 9 जुलै रोजी भारताविरोधात होणाऱ्या एकमेव ट्वेण्टी-20 सामन्यासाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. स्फोटक फलंदाज ख्रिस गेलची विंडीज संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना गेलचा जलवा पाहायला मिळणार आहे.


गेल मागील काही काळापासून संघातून बाहेर होतो. त्याने आपला अखेरचा ट्वेण्टी-20 सामना एप्रिल 2016 मध्ये खेळला होता. क्रिकेट वेस्ट इंडिजचे संचालक कर्टनी ब्राऊनने गेलच्या कमबॅकची माहिती दिली आणि निर्णयाचं स्वागतही केलं.

ब्राऊन म्हणाले की, "टी-20 संघात खिस गेलच्या पुनरागमनाचं स्वागत करतो. गेल या फॉरमॅटमधील सर्वात धोकादायक फलंदाज आहे. गेलच्या कमबॅकमुळे संघाला बळकटी मिळेल. गेलकडे घरच्या मैदानावर जगातील सर्वात मजबूत संघाविरोधात आपली शक्ती दाखवण्याची संधी असेल."

"टी-20 संघ संतुलित दिसत आहे. संघात अनुभव आणि युवा खेळाडूंचं मिश्रण आहे. युवा खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी असेल. तर युवा खेळाडूंना अनुभवी खेळाडूंकडून शिकता येईल," असंही कर्टनी ब्राऊन म्हणाले.

गेलने आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत एकूण 50 ट्वेण्टी-20 सामने खेळले आहेत. या दरम्यान गेलने 35.32 च्या सरासरीने आणि 145.49 च्या स्ट्राईक रेटने 1,519 धावा केल्या आहेत. गेलने 2 शतकं आणि 13 अर्धशतकं ठोकली असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 117 आहे.

गेलशिवाय संघात कार्लोस ब्रेथवेट, सुनील नरेन, मार्लन सॅमुअल्स आणि जेरॉम टेलरचाही समावेश करण्यात आला आहे.

9 जुलैला भारत-वेस्ट इंडिज सामना
भारत आणि वेस्ट इंडिज संघातील एकमेव टी-20 सामना 9 जुलै रोजी खेळवण्यात येईल. नुकत्यानुकत्याच अफगाणिस्तानविरोधातील 3 सामन्याच्या टी-20 मालिकेत गेलला वगळण्यात आलं होतं. आता त्याला लेंडल सिमन्सच्या जागी घेण्यात आलं आहे. अफगाणिस्तानविरोधातील मालिकेत सिमन्सची कामगिरी फारशी चांगली नव्हती. त्याने 3 सामन्यांमध्ये अनुक्रमे 6, 17 नाबाद आणि 15 धावा केल्या होत्या. त्यामुळे सिलेक्टर्सकडे गेलशिवाय दुसरा पर्याय नव्हता.