AFC Women's Asian Cup: चीन पीआर संघाने (China PR) एएफसी वुमन्स आशिया कप भारत, 2022 स्पर्धेच्या (AFC Women's Asian Cup) अंतिम सामन्यात कोरिया रिपब्लिकला (Korea Republic) 3-2 ने मात देत स्पर्धेचं जेतेपद मिळवलं आहे. त्यांनी याआधीच स्पर्धेतील अप्रतिम कामगिरीमुळे 2023 च्या फिफा महिला विश्वचषक स्पर्धेत थेट स्थानही मिळवलं होतं. त्यामुळे त्याठिकाणीही त्यांच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


सामन्यात चीन पीआरने दोन गोलची पिछाडी भरून काढत कोरिया रिपब्लिक संघाला 3-2 ने मात दिली. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर हा अंतिम सामना पार पडला. या अटीतटीच्या सामन्यात मध्यंतरादरम्यानतर कोरिया रिपब्लिकने 2-0 ची आघाडी घेतली होती. पण, उत्तरार्धात चीन पीआर संघाने कमालीचा आक्रमक खेळ करत बाजी पलटवली. टँग जिआली, झँग लिनयान आणि झिआओ युयी यांनी तीन गोल करून संघाच्या नवव्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. कोरियाला पुन्हा एकदा करंडकाशिवाय परतावे लागले. 


असा पार पडला सामना


सामना सुरू झाल्यापासून दोन्ही संघानी अटीतटीचा खेळ सुरु केला. पण चीन पीआर संघाची आक्रमणं कोरियाच्या गोलकिपरने परतावून लावली. कोरिया रिपब्लिक संघाने पूर्वाधार्चा अर्धा वेळ संपल्यावर खेळावर नियंत्रण राखायला सुरवात केली. सामन्याच्या 27 व्या मिनिटाला मिळालेली पहिलीच संधी त्यांनी सार्थकी लावली. ली जेऊम मिन हिने बचाव भेदून चीन पीआरच्या गोलकक्षात धडक मारली. तिने संधी साधून चोए यु री हिच्याकडे पास दिला आणि तिने गोल करत कोरिया रिपब्लिकला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मध्यंतरापूर्वी आणखी एक पेनल्टीची संधी कोरियाला मिळाली. जी सो युन हिने गोल करत संघाला 2-0 ची आघाडी मिळवून दिली. पण त्यानंतर चीन पीआर संघाचे प्राशिक्षक शुई क्वींगझिया यांनी झिआओ युई आणि झँग रुई यांना उत्तरार्धाच्या सुरवातीपासून मैदानात उतरवले. त्यांचा हा निर्णय अचूक ठरला. या दोघींच्या खेळाने चायना पीआर संघाला पुन्हा सामन्यात आणले. 68 व्या मिनिटाला चीन पीआर संघाला पेनल्टी मिळाली. टँग हिने ही संधी साधून संघाचा पहिला गोल केला. त्यानंतर पुन्हा एकदा टँगने कोरिया रिपब्लिकच्या दोन बचावपटूंना चकवून मुसंडी मारली आणि गोलपोस्टच्या जवळ सहा यार्डावर असणाऱ्या झँग लिनयान हिच्याकडे सुरेख पास दिला. तिनेही ही संधी दवडली नाही आणि चेंडूला जाळीची दिशा देत बरोबरी साधली. त्यानंतर वँग शानशान हिच्या सहाय्याने वँग युई हिने सामन्यात शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना अखेरचा गोल केला. गोलसह चीन पीआरने 3-2 ने सामना जिंकला.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha