चेन्नई: चेन्नई कसोटीत टीम इंडियानं दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद 60 धावांची मजल मारून इंग्लंडच्या 477 धावांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा लोकेश राहुल 30 आणि पार्थिव पटेल 29 धावांवर खेळत होते.पहिल्या डावात भारतीय संघ अजूनही 417 धावांनी पिछाडीवर आहे.
त्याआधी आदिल रशिद आणि लियाम डॉसनच्या अर्धशतकांमुळं इंग्लंडनं पहिल्या डावात सर्व बाद 477 धावांची मजल मारली.
इंग्लंडनं दुसऱ्या दिवशी चार बाद 284 धावांवरुन खेळण्यास सुरुवात केली. मात्र पहिल्याच सत्रात रविचंद्रन अश्विन, ईशांत शर्मा आणि उमेश यादवनं इंग्लंडला दणके दिले. त्यामुळं इंग्लंडची सात बाद 321 अशी अवस्था झाली होती. पण डॉसन आणि रशिदनं आठव्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी रचून इंग्लंडचा डाव सावरला.
आदिल रशिदनं 60 आणि लियाम डॉवसननं नाबाद 66 धावांची खेळी केली. त्याआधी मोईन अलीनं 262 चेंडूंत तेरा चौकार आणि एका षटकारासह 146 धावांची खेळी रचली.
पहिल्या दिवसाचा खेळ :
शतकवीर मोईन अलीला ज्यो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी दिलेल्या दमदार साथीनं, इंग्लंडने दिवसअखेर चार बाद 284 धावांची मजल मारली. मोईन अली 120 धावांवर तर बेन स्टोक्स पाच धावांवर खेळत होता.
इशांत शर्मानं कीटन जेनिंग्सला आणि रवींद्र जाडेजानं अॅलेस्टर कूकला बाद करून इंग्लंडची 2 बाद 21 अशी अवस्था केली होती. पण ज्यो रूट आणि मोईन अलीनं तिसऱ्या विकेटसाठी 146 धावांची भागीदारी रचून इंग्लंडचा डाव सावरला.
विराट कोहलीची टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत एका ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर आहे. टीम इंडियानं मुंबईची चौथी कसोटी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. चेन्नईत पाचवी आणि अखेरची कसोटी खेळवण्यात येत आहे. त्यामुळे अंतिम कसोटी जिंकून इंग्लंडवर 4-0 असा विजय साजरा करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे.