मुंबई : ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटने प्रत्येक स्मार्टफोनधारकांना लाईव्ह स्ट्रिमिंग करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. साधारणपणे वर्षभरापासून ट्विटरने अधिग्रहित केलेल्या पेरिस्कोप या अॅपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रिमिंग म्हणजेच थेट प्रक्षेपणाची सुविधा यापूर्वीच होती. आता कोणत्याही त्रयस्थ अॅपशिवाय थेट ट्विटर कॅमेऱ्याच्या मदतीने तुम्ही जे काही पाहात आहात ते आता थेट प्रक्षेपित करु शकता... तुम्हाला ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांच्या टाईमलाईनवर तुमचं थेट प्रक्षेपण प्रसारित होत राहील.


https://twitter.com/video/status/809442927646650368

ट्वीटरने काल #GoLive या हॅशटॅगने जारी केलेल्या ट्वीटमधून लाईव्ह स्ट्रिमिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली. तुम्हाला ट्विटरच्या मदतीने काहीही लाईव्ह करायचं असेल तर आपल्या स्मार्टफोनमधील ट्विटर अॅप ओपन करा. त्यानंतर नवीन ट्वीट टाईप करण्यासाठी क्लिक करा. तिथे असलेल्या कॅमेऱ्याच्या इमेजवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला स्टिल कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेला लाईव्हचा पर्याय दिसेल.

या लाईव्हच्या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्ही थेट प्रक्षेपणासाठी सज्ज आहात. तुम्ही कशाचं थेट प्रक्षेपण करणार आहात, त्याविषयी थोडक्यात माहिती द्या आणि करा सुरुवात थेट प्रक्षेपणाला. ट्विटरच्या मालकीच्या पेरिस्कोप या लाईव्ह स्ट्रिमिंग अॅपच्या मदतीने लाईव्ह स्ट्रिमिंग करणं, हे तसं खूप लोकप्रिय झालं आहे. पॅरीसमध्ये झालेला अतिरेकी हल्ला हा पेरिस्कोप लाईव्हमुळेच संबंध जगाला समजला असं सांगितलं जातं.

सोशल नेटवर्किंग मधील सर्वात मोठं नाव असलेल्या फेसबुकने यापूर्वीच आपल्या यूजर्सना लाईव्ह स्ट्रिमिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तर डेस्कटॉप लाईव्ह स्ट्रिंमिंगचा पर्याय खूप आधीपासून असलेल्या आणि व्हिडिओचा सर्वात मोठा संग्रह असलेल्या यूट्यूबनेही आता स्मार्टफोनमधून लाईव्ह स्ट्रिमिंगची सोय करुन दिली. मात्र भारतात अजून हा पर्याय यूट्यूब यूजर्सना मिळालेला नाही.