शतकी खेळी करणारा सलामीचा शेन वॉटसन चेन्नईच्या फायनलमधल्या यशाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने 57 चेंडूंत आठ षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 117 धावांची नाबाद खेळी केली. आयपीएलच्या फायनलमध्ये शतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला. 16 धावा करणाऱ्या अंबाती रायडूने विजयी चौकार ठोकला.
चेन्नईने यंदा तिसरं विजेतेपद पटकावून आयपीएलमधलं पुनरागमन मोठ्या रुबाबात साजरं केलं. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नईवर गेली दोन वर्षे बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा महेंद्र सिंह धोनीच्याच नेतृत्त्वात मैदानात उतरत आपणच चॅम्पियन असल्याचं सिद्ध करुन दिलं.
वॉटसनने सुरेश रैनाच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या 57 चेंडूंत 117 धावांची भागीदारी उभारली. या भागीदारीने हैदराबादच्या आव्हानातली हवाच काढून घेतली. चेन्नईने नऊ चेंडू राखून हैदराबादचं आव्हान पार केलं.
शेन वॉटसनचं यंदाचं दुसरं शतक
सलामीवीर फलंदाज शेन वॉटसनने यंदाच्या आयपीएलमधलं दुसरं शतक ठोकलं. यापूर्वीच त्याच्या नावावर एक शकत जमा होतं. फायनल सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करताना शतक ठोकणारा तो आयपीएल इतिहासातला एकमेव फलंदाज आहे. विशेष म्हणजे शेन वॉटसन खेळायला आला तेव्हा पहिल्या 10 चेंडूमध्ये त्याच्या खात्यात एकही धाव नव्हती. मात्र पुढच्या 41 चेंडूमध्ये त्याने 100 धावा पूर्ण केल्या.
चेन्नई तिसऱ्यांदा चॅम्पियन
या विजयासोबतच चेन्नईने तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे. यापूर्वी 2010 साली मुंबई इंडियन्सविरुद्ध अंतिम सामना 22 धावांनी जिंकला होता, तर 2011 साली फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 58 धावांनी पराभव केला होता. विशेष म्हणजे तीनही वेळा धोनीच्याच नेतृत्त्वात चेन्नईने आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे.