चंद्रपूर : सध्या लेग स्पिन गोलंदाजांसाठी सुगीचे दिवस आहेत. त्याच सुमारास भारतातल्या अंडर नाईन्टिन क्रिकेटमध्ये रोहित दत्तात्रय या लेग स्पिनरच्या नावाची चर्चा होऊ लागली. चंद्रपूरच्या या गुणी लेग स्पिनरनं यंदाच्या मोसमात अशी काय कामगिरी बजावली, की धर्मशालातल्या अंडर नाईन्टिन राष्ट्रीय शिबिरासाठी त्याची निवड झाली.


एकोणीस वर्षांखालील वयोगटाच्या कूचबिहार करंडकात रोहित दत्तात्रयच्या लेग स्पिननं यंदा धुमाकूळ घातला. त्यानं नऊ सामन्यांमध्ये तब्बल ३५ फलंदाजांना माघारी धाडून बीसीसीआयच्या ज्युनियर निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं.

रोहितची हीच कामगिरी विदर्भाच्या कूचबिहार करंडकातल्या यशात मोलाची ठरली. साहजिकच बीसीसीआयच्या अंडर नाईन्टिन राष्ट्रीय शिबिरासाठी रोहित दत्तात्रयची निवड झाली आहे.

चंद्रपूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रोहितला बालपणापासून क्रिकेटची आवड होती. पण चंद्रपुरात क्रिकेटची पायाभूत सुविधा नसल्यानं, रोहितला क्रिकेट खेळू द्यावं की नाही याबाबत त्याच्या पालकांच्या मनात शंका होती. पण रोहितनं आपल्या खेळात सातत्य ठेवून आपल्या पालकांचा विश्वास जिंकला.

रोहितनं वयाच्या अकराव्या वर्षी आपल्या थोरल्या भावाचा आदर्श घेऊन क्रिकेट खेळायला सुरुवात केली. रोहितची खेळातली गती पाहून त्याची पहिल्यांदा विदर्भाच्या अंडर थर्टिन संघात निवड झाली. त्यानं राजसिंग डुंगरपूर करंडकातल्या पदार्पणात १० विकेट्स काढून आपली निवड सार्थही ठरवली. विदर्भानं विजय मर्चंट करंड जिंकला, त्या वेळी रोहितनं आठ विकेट्स काढून अंतिम सामन्याला कलाटणी दिली होती. यंदा अंडर नाईन्टिन वयोगटातही त्यानं आपल्या लेग स्पिनचा करिश्मा दाखवून दिला.

रोहित सध्या चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयात वाणिज्य शाखेत अकरावीला आहे. लेग स्पिनर म्हणून त्याची प्रतिभा आणि त्याचा विनयशील स्वभाव यामुळं तो प्रशिक्षकांचाही लाडका आहे. गुगली हे त्याच्या भात्यातलं महत्त्वाचं अस्त्र असल्याचं प्रशिक्षकांचं म्हणणं आहे.

रांचीसारख्या छोट्या शहरातून उदयास आलेल्या महेंद्रसिंग धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लाभलेल्या यशानं गावागावातल्या मुलांना एक नवा आत्मविश्वास मिळवून दिला. ‘हम किसी से कम नही’ असं बजावून सांगणारा हा आत्मविश्वासच रोहित दत्तात्रयसारख्या मुलांना आणखी पुढं घेऊन जाणार आहे.