लंडन: सरफराज अहमदच्या पाकिस्ताननं टीम इंडियाचा 180 धावांनी धुव्वा उडवून पहिल्यांदाच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.
लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर झालेल्या अंतिम सामन्यावर पाकिस्ताननं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात पाकिस्ताननं भारताला विजयासाठी 339 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य दिलं होतं.
त्या लक्ष्याच्या दडपणाखाली टीम इंडियाचा अख्खा डाव अवघ्या 158 धावांत गडगडला.
भारताकडून हार्दिक पांड्यानं 76 धावांची खेळी करून एकाकी झुंज दिली. टीम इंडियाच्या अन्य दहा फलंदाजांनी मिळून केवळ 79 धावाच जमवल्या.
भारत हरला मात्र हार्दिक पांड्याने सर्वांची मनं जिंकली. पंड्याने तुफानी फलंदाजी करत 43 चेंडूत 76 धावा ठोकल्या.
आयसीसी वनडे स्पर्धेच्या फायनलमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम पांड्याच्या नावावर जमा झाला.
पांड्याने 1999 च्या वन डे विश्वचषकाच्या फायनलमधील ऑस्ट्रेलियाच्य अडम ग्रिलख्रिस्टचा विक्रम मोडला. गिलख्रिस्टने 33 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.
पांड्याने केवळ 32 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांच्या सहाय्याने अर्धशतक झळकावलं. तर 43 चेंडूत 6 षटकार आणि 4 चौकारांच्या सहाय्याने 76 धावा ठोकल्या. पांड्याने शादाब खानला सलग तीन षटकार ठोकले.
मात्र रवींद्र जाडेजासोबतच्या समन्वयाअभावी हार्दिक पांड्या धावबाद झाला. पण तोपर्यंत हार्दिक पांड्याने तमाम भारतीयांची मनं जिंकली होती.