चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना लोक देवाच्या ठिकाणी का मानतात याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. नदीजोड प्रकल्पासाठी एक कोटी रुपयांची मदत करणार असल्याचं रजनीकांत यांनी सांगितलं.
रजनीकांत यांनी रविवारी पी. अय्यकन्नू यांच्या नेतृत्त्वाखालील 16 शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत त्यांनी नदीजोड प्रकल्पाला पाठिंबा देत एक कोटी रुपयांची मदत देणार असल्याचं जाहीर केलं.
शिवाय या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्त्व करण्याचं निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदींना देऊ, असंही रजनीकांत यांनी सांगितलं.
पहिल्या टप्प्यात महानदी, गोदावरी, कृष्णा, पालारु आणि कावेरी या नद्या जोडणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
रजनीकांत यांनी या योजनेसाठी तात्काळ एक कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवला. पण, त्यांनी ही रक्कम पंतप्रधानांकडे सुपूर्द करावी, अशी विनंती त्यांना केल्याचं अय्याकन्नू यांनी सांगितलं.
दरम्यान, रजनीकांत यांचा सक्रिय सहभाग पाहता, त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा पुन्हा रंगली आहे.