कोलकाता : पंतप्रधान मोदींचे गुरु आणि रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी आत्मस्थानंद यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. काल रात्री कोलकातामधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. स्वामीजींच्या निधानावर पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन आपला शोक व्यक्त केला आहे.




पंतप्रधान मोदींनी स्वामी आत्मस्थानंद यांच्यासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान म्हणाले की, ''स्वामी आत्मस्थानंद यांच्या निधनानं माझं वैयक्तीक मोठं नुकसान झालं आहे. माझ्या जीवनातील महत्त्वाचा काळात मी त्यांच्या सानिध्यात होतो.''

याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही स्वामीजींना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे.




गेल्या अनेक दिवसांपासून स्वामी आत्मस्थानंद आजारी होते. 17 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांची भेट घेऊन, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

पंतप्रधान मोदींनी वयाच्या 20 व्या वर्षी स्वामी आत्मस्थानंद यांच्याकडून दीक्षा घेण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यावेळी आत्मस्थानंद यांनी दीक्षा देण्यास नकार दिला, तसेच त्यांनी समाजसेवेचं व्रत अंगिकारण्याच सल्ला दिला.

मोदी आत्मस्थानंद यांच्या शिकवणीतून प्रभावित झाले होते, त्यामुळे त्यांनी आत्मस्थानंद यांना गुरु मानलं होतं. हिमालयातून परतल्यानंतर मोदी काही काळ आत्मस्थानंद यांच्या सहवासात राहिले होते.

दरम्यान, स्वामी आत्मस्थानंद यांच्यावर आज कोलकाताच्या बेलूर मठात अंत्यसंस्कार होणार आहेत.