नवी दिल्ली/लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडने उपांत्य सामन्याचं तिकीट बूक केलं आहे. मात्र इतर संघांच्या बाबतीत अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे दोन्हीही गटातून उपांत्य सामन्यात कोण धडक मारणार, याबाबत आणखी सस्पेंस आहे.


इंग्लंडने उपांत्य फेरीत स्थान आधीच पक्कं केलं आहे. पण ब गटाच्या संघांना अजूनही दोन सामने खेळावे लागणार आहेत.

अ गटातील ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि बांगलादेश या संघांना उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चीत करावं लागणार आहे.

ब गटात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला हरवलं होतं. त्यानंतर श्रीलंकेने भारतावर मिळवलेल्या विजयाने स्पर्धेला आणखी रोमांचक बनवलं. आता अ गटातून आणि ब गटातून 11 आणि 12 जूनला होणाऱ्या सामन्यांना उपांत्यपूर्व सामन्यांचं रुप प्राप्त झालं आहे, ज्यामध्ये विजय मिळवणारे संघ उपांत्य फेरीचं तिकीट बूक करतील.

ब गटात उपांत्यपूर्व सामना

श्रीलंकेने पराभवाचा धक्का दिल्याने भारताचं थेट उपांत्य सामन्यात जाण्याचं स्वप्न भंगलं. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका आणि भारताकडे उपांत्य फेरीत जाण्यासाठी एकमेव संधी उरली आहे. ब गटातून उपांत्य फेरीत प्रवेश करणारा संघ इंग्लंड किंवा इतर संघासोबत भिडणार आहे.

... तर अंतिम सामन्यात पुन्हा भारत विरुद्ध पाकिस्तान!

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात. कारण भारताने दक्षिण आफ्रिकेला आणि पाकिस्तानने श्रीलंकेला बाद केलं तर, क्रिकेटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमधली लढत बघायला मिळू शकते. दरम्यान सध्या ही सर्व समीकरणंच आहेत. कारण निर्णायक सामने अजून बाकी आहेत.