लंडन: श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करून, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियावर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे.


या सामन्यात टीम इंडियानं श्रीलंकेला विजयासाठी 322 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य दिलं होतं. पण श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीवर हल्लाबोल करून त्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.

श्रीलंकेकडून गुणतिलका, कुशल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज यांनी अर्धशतकं झळकावली तर परेरा आणि गुणरत्नेनं ऐन मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत भारतावर दणदणीत विजय मिळवला. या पराभवामुळे भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील प्रवास अधिक खडतर झाला आहे.

दरम्यान, सुरुवातीला भारतानं फलंदाजी करत 321 धावा केल्या होत्या. शिखर धवननं झळकावलेलं शतक आणि त्यानं रोहित शर्मा, तसंच महेंद्रसिंग धोनीच्या साथीनं रचलेल्या मोठ्या भागिदाऱ्यांनी टीम इंडियाला 50 षटकांत सहा बाद 321 धावांपर्यंत मजल मारता आली होती.

या सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्मानं 138 धावांची सलामी देऊन भारतीय डावाचा पाया रचला होता. मग धवननं धोनीच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी रचून भारतीय डावाला आणखी मजबुती दिली होती. रोहितनं 79 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 78 धावांची खेळी केली होती.

हा सामना गमावल्यानं टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. त्यामुळे आता भारतासाठी पुढचा सामना 'करो वा मरो' असणार आहे.