पुणे : मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मेहरुन्निसा दलवाई यांचं निधन झालं. पुण्यातील राहत्या घरी सकाळी 11.30 वाजता मेहरुन्निसा दलवाई यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 88 वर्षांच्या होत्या.


मेहरुन्निसा दलवाई या मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक आणि क्रांतिकारी विचारवंत हमीद दलावाई यांच्या पत्नी. मेहरुन्निसा दलवाई यांच्या पश्चात इला कांबळी आणि रुबिना चव्हाण या दोन मुली आहेत.

हमीद दलवाई हयात असताना त्यांच्या समाज सुधारणेच्या चळवळीत सर्वोतपरी सहकार्य मेहरुन्निसा यांनी केले. हमीद दलवाई यांच्या निधनानंतरही मेहरुन्निसा यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळात सक्रीय सहभाग कायम ठेवला.

मेहरुन्निसा दलवाई यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात येणार आहे. मेहरुन्निसा दलवाई यांचा देह अंत्यदर्शनासाठी हडपसर येथील साने गुरुजी हॉस्पिटल येथे ठेवण्यात येणार आहे.

मेहरुन्निसा दलवाई यांचा अल्पपरिचय :

मेहरुन्निसा दलवाई यांचा 25 मे 1930 रोजी पुण्यात जन्म झाला. हमीद दलवाई यांच्याशी त्यांचा 1956 मध्ये इस्लामिक पद्धतिने विवाह झाला. नंतर एका महिन्याच्या अंतरात त्यांनी विशेष विवाह कायदा 1954 अंतर्गत नोदणी विवाह केला.

उर्दू भाषिक मेहरुन्निसा दलवाई यांनी अल्पावधित मराठी भाषा अवगत केली. त्यांच्या दोन्ही रुबिना व ईला या मुलीनी आंतरधर्मीय विवाह केला.

हमीद दलवाई यांच्या निधनानंतर त्या मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात अधिक सक्रिय झाल्या. मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले.



शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम रहावा म्हणून मेहरुन्निसा दलवाई यांनी संघर्ष केला. तसेच 1986-87 मध्ये त्यांनी महाराष्ट्रात तलाक मुक्ती मोर्चा काढला होता.

हमीद दलवाई यांच्या निधनानंतर म्हणजे 1977 नंतर मेहरुन्निसा दलवाई यांनी पुण्यात हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्युटची स्थापना करण्यात मोठा पुढाकार घेतला. अशाप्रकारची रिसर्च इन्स्टिट्युट उभारण्याचं हमीद दलावाई यांचं स्वप्न होतं.

मेहरुन्निसा दलवाई यांची ‘मी भरुन पावले आहे’ ही आत्मकथा प्रकाशित झाली. पुढे याच आत्मकथेचं हिंदीत ‘मैं कृतार्थ हुई’ असा अनुवादही झाला.