LIVE: भारताचा बांगलादेशवर 9 विकेट राखून दणदणीत विजय, टीम इंडियाची फायनलमध्ये धडक
LIVE : रोहित शर्माचं शानदार शतक, 111 चेंडूत 102 धावा, रोहितचं वनडेतील अकरावं शतक, टीम इंडिया विजयाच्या समीप
LIVE: विराटचं खणखणीत अर्धशतक, भारत मजबूत स्थितीत
LIVE: रोहित शर्माचं शानदार अर्धशतक, 57 चेंडूत 50 धावा
LIVE: भारताला पहिला धक्का, शिखर धवन 46 धावांवर बाद
या सामन्यात भारताच्या भुवनेश्वर कुमारची तोफ सलामीलाच धडाडली. त्यानं सौम्य सरकार आणि शब्बीर रहमान स्वस्तात माघारी धाडलं होतं. पण त्यानंतर तमिम इक्बाल आणि मुशफिकुर रहिम यांनी तिसऱ्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी रचून बांगलादेशच्या डावाला आकार दिला.
तमिम आणि मुशफिकुर रहिम यांनी भारतीय आक्रमणावर चढवलेला हल्लाबोल पाहता बांगलादेश भारताला विजयासाठी मोठं लक्ष्य देणार असं वाटत होतं. पण केदार जाधवच्या फिरकीनं सामन्याला पुन्हा गिरकी दिली. त्यानं तमिम आणि मुशफिकुर यांच्या दोन बहुमोल विकेट्स काढून सामना पुन्हा भारताच्या बाजूनं झुकवला.
LIVE : बांगलादेशचं भारतासमोर 265 धावांचं आव्हान
LIVE : बांगलादेशला सहावा धक्का, बुमराचा भेदक मारा
LIVE : बांगलादेशला पाचवा धक्का, केदार जाधवनं घेतले दोन बळी
LIVE : बांगलादेशचा चौथा गडी बाद, शकीब अल हसन बाद
LIVE: बांगलादेशला तिसरा धक्का, तमिम इक्बाल 70 धावांवर बाद
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकली असून, त्यानं या सामन्यात पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळं बांगलादेशला या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करावी लागणार आहे.
भारत आणि बांगलादेश संघांमधला हा सामना बर्मिंगहॅमच्या एजबस्टनवर खेळवण्यात येत आहे. भारतानं बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातलाच संघ कायम ठेवला आहे.
LIVE UPDATE -
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणात भारताच्या भुवनेश्वर कुमारची तोफ सुरुवातीपासूनच धडाडली. त्यानं सलामीचा सौम्य सरकार आणि शब्बीर रहमानला माघारी धाडून बांगलादेशला बॅकफूटवर धाडलं आहे. त्यामुळं उपांत्य फेरीच्या या सामन्यात बांगलादेशवर दोन बाद 31 अशी कठीण वेळ ओढवली होती. पण मुशफिकुर रहिमनं भारतीय आक्रमणावर प्रतिहल्ला चढवून बांगलादेशच्या डावाला आकार दिला.
- भुवनेश्वरचा दणका, सौम्या सरकारची दांडी गुल, बांगलादेश 1/1 (0.5) #IndvsBan
- भुवनेश्वरचा दुसरा दणका, सब्बीर रहमान (19) बाद, बांगलादेश 31/2 (6.5)
टीम इंडियाशी मुकाबला
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणात बलाढ्य न्यूझीलंडवर मिळवलेल्या विजयानं बांगलादेशचा आत्मविश्वास टीपेला पोहोचलाय. त्या बांगलादेशचा सामना आज विराट कोहलीच्या टीम इंडियाशी होत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि बांगलादेश संघांमधला हा उपांत्य सामना बर्मिंगहॅमच्या एजबस्टनवर खेळवण्यात येत आहे.
बांगलादेशच्या खेळाडूंमधल्या उंचावलेल्या आत्मविश्वासाचं कारण आहे त्यांनी अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडचा पाच विकेट्सनी केलेला पराभव. बांगलादेशच्या गोलंदाजांनी या सामन्यात न्यूझीलंडला आठ बाद 265 या माफक धावसंख्येत रोखलं होतं. त्यानंतर बांगलादेशचीही चार बाद 33 अशी घसरगुंडी उडाली होती. पण शकिब अल हसन आणि महमुद उल्लानं वैयक्तिक शतकं झळकावून, बांगलादेशला त्या केविलवाण्या परिस्थितीतून बाहेर काढलं आणि चक्क विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं. त्या दोघांनी पाचव्या विकेटसाठी थोडीथोडकी नाही, तर तब्बल 224 धावांची भागीदारी रचली.
न्यूझीलंडविरुद्धच्या याच कामगिरीनं बांगलादेशला एक मोठा आत्मविश्वास मिळवून दिला आहे.
पण हा आत्मविश्वास बांगलादेशला टीम इंडियाला हरवण्याचं बळ मिळवून देऊ शकतो का? या प्रश्नाचं उत्तर कागदावर तरी नाही असंच आहे. वास्तविक कागदावरच काय, पण मैदानावरही विराट कोहलीची टीम इंडिया बांगलादेशच्या तुलनेत लय भारी आहे.
इऑन मॉर्गनच्या इंग्लंडच्या बरोबरीनं यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत आपली ताकद दाखवून देणारा संघ कोणता असेल तर तो आहे टीम इंडिया. श्रीलंकेविरुद्धच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा आणि बोथट आक्रमणाचा अपवाद सोडला तर भारतीय शिलेदारांनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपल्या कामगिरीचा नेटका ठसा उमटवला आहे.
शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली सातत्यानं धावा करत आहेत. युवराजसिंग आणि महेंद्रसिंग धोनीनंही संधी मिळताच आपलं उखळ पांढरं करून घेतलं. आता बांगलादेशसमोरही आपली धावांची टांकसाळ पुन्हा उघडायला भारतीय फलंदाज उत्सुक असतील.
भारतीय फलंदाजांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या दादागिरीला वेसण घालण्यासाठी बांगलादेशनं आपल्या वेगवान अस्त्रांचा वापर करण्याची रणनीती आखल्याची माहिती आहे. रुबेल हुसेन, टस्किन अहमद, मुस्तफिजूर रेहमान आणि मश्रफे मोर्तझा ही वेगवान चौकडी बर्मिंगहॅमच्या लढाईत भारतीय फलंदाजांवर चाल करून जातील.
बांगलादेशच्या या वेगवान आक्रमणाला टीम इंडियाच्या भात्यात संमिश्र आक्रमणाचं उत्तर आहे. भारताच्या भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जाडेजाकडून श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात झालेल्या चुका त्यांनी दक्षिण आफ्रिकेसमोर सुधारलेल्या दिसल्या. रवीचंद्रन अश्विननंही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आपल्या ऑफ स्पिनच्या अस्त्राला धार काढून घेतली. बांगलादेशच्या संघातही तमिम इक्बाल, सौम्या सरकार आणि शकिब अल हसन यांच्यासारख्या डावखुऱ्या फलंदाजांचा भरणा आहे. त्यामुळं अश्विनचे हात नक्कीच शिवशिवत असतील.
टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेविरुद्धचं क्षेत्ररक्षण इतकं चपळ होतं, की भारतीय क्षेत्ररक्षकांनी त्यांच्या तीन फलंदाजांना धावचीत केलं.
टीम इंडियाच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातल्या याच सुधारित आवृत्तीनं दक्षिण आफ्रिकेसारख्या नंबर वन टीमलाही साफ चिरडून टाकलं. विराट कोहली आणि त्याच्या शिलेदारांनी बर्मिंगहॅमच्या लढाईतही तोच फॉर्म कायम राखला तर बांगलादेशचं काही खरं नाही.
विजय साळवी, एबीपी माझा, मुंबई