मुंबई: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर आता मच्छिमारांनीही कर्जमाफीची मागणी केली आहे.
मच्छिमार कृती समितीच्या दामोदर तांडेल यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने, मत्स्यव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेतली.
यावेळी झालेल्या चर्चेत महादेव जानकर यांनी कोकणातील मच्छिमारांचा व्यवसाय संकटात असल्याचे मान्य केले आणि मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करून बैठक घेण्याचे तसेच याबाबतचा प्रस्ताव तयार करून शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांना कर्जमाफीच्या निर्णयाचा दिलासा देता यावा यासाठी येत्या पंधरा दिवसात प्रस्ताव तयार करण्याचे आश्वासन दिले.
मत्स्यव्यवसाय विभागामार्फत कोकण विभागामध्ये 1977 पूर्वी नैसर्गीक आपत्ती, मत्स्यशेतीसाठी अतिरिक्त प्रोत्साहन, पूरग्रस्तांना कर्ज, इतर बाबीसाठी कर्ज, आणि सर्वसाधारण बाबी या उद्दिष्टापोटी दिलेली जुनी कर्जे आणि व्याज मिळून एकूण 237.20 लाख इतकी रक्कम थकीत असून, 1260.13 लाख व्याज असे एकूण 1497.33 लाख कर्ज व्याजासहीत कर्जमाफीसाठी प्रस्तावित आहे.
शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली.
विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनीही 7 वा वेतन आयोग लागू न झाल्यास संपाचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता मच्छीमारांनीही कर्जमाफीची मागणी केल्यानं सरकारसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.