ब्रिस्बेन : असद शफीकच्या 137 धावांच्या झुंजार खेळीनंतरही पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून 39 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ब्रिस्बेनमधील अतिशय रोमांचक सामन्यात पाकिस्तान इतिहास रचण्यापासून वंचित राहिला. मिचेल स्टार्कच्या शानदार बाऊन्सरवर असद शफीक बाद झाला आणि सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला. त्यानंतर यासिर शाह 33 धावांवर धावचित झाल्याने पाकिस्तानचा डाव संपुष्टात आला.


ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 490 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला 450 धावा करता आल्या. पाकिस्तानने हा सामना जिंकला असता तर  कसोटी क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना हा सर्वात मोठा विजय ठरला असता. परंतु एवढ्या धावा करुनही सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम करण्यापासून पाकिस्तानचा संघ हुकला.

कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या डावात आव्हानाचा पाठलाग करण्याचा विक्रम वेस्ट इंडीजच्या नावावर आहे. विंडीजने 2003मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 418 धावा केल्या होत्या.

220 धावांवर पाकिस्तानचे सहा फलंदाज माघारी परतले होते. यानंतर असद शफीकने पहिल्यांदा मोहम्मद आमीरसह (48 धावा) 92, वहाब रियाजसोबत (30 धावा) 76, यासिर शाहसोबत (33 धावा) नवव्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी रचली आणि संघाला विजयाजवळ नेलं.

असदच्या शानदार डावाचा अंत मिचेल स्टार्कच्या शानदार बॉलने झाला. शफीकला स्टार्कचा बाऊन्सर नीट समजला नाही. बॉल शफीकच्या ग्लोव्ज आणि बॅटच्या वरील भागाला चाटून गेला. त्यानंतर गलीमध्ये असलेल्या डेव्हिड वॉर्नरने कोणतीही चूक न करता बॉल पकडला. असद शफीकने 207 चेंडूत 13 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 137 धावा केल्या.

याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात कर्णधार स्टीव्ह स्मिथ (130 धावा) आणि पीटर हॅण्डस्कॉम्ब (105 धावा) यांच्या शतकांच्या जोरावर 429 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानला केवळ 142 धावांवर आटोपला. यामुळे ऑस्ट्रेलियाला 287 धावांची आघाडी मिळाली. यानंतर यजमान संघाने दुसऱ्या डावात पाच विकेट्सच्या मोबदल्यात 202 धावा करुन, पाकिस्तानसमोर विजयासाठी 490 धावांचं डोंगराएवढं आव्हान ठेवलं. मात्र दुसऱ्या डावात पाकिस्तानने चांगला खेळ केला. पण ठराविक अंतरावर विकेट्स पडत होत्या.

सलामीवीर अजहर अली (71 धावा) आणि युनुस खान (65 धावा) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानचा संघर्ष सुरुच होता. यानंतर असद शफीकचा सामन्याची सूत्रं हातात घेतली आणि अखेरपर्यंत लढा दिला. परंतु त्याचा लढा अपयशी ठरला. असद शफीकच्या (137 धावा) रुपात पाकिस्तानची नववी विकेट पडली. त्यानंतर यासिरही शाह धावचित झाला आणि पाकिस्तान विक्रमापासून वंचिर राहिला. मिचेल स्टार्कने 119 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. तर जॅक्सन बर्डने 3 आणि नॅथन लियोनने 2 विकेट्स घेतल्या. 137 धावांची खेळी करणाऱ्या असद शफीकला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.

गॅरी सोबर्सचा विक्रम मोडित

असद शफीकचं कसोटी कारकीर्दीतील हे नववं शतक आहे. विशेष म्हणजे सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करुन त्याने सगळी शतकं ठोकली आहे. हा देखील एक विक्रमच आहे. त्याने वेस्ट इंडीजचे महान फलंदाज गॅरी सोबर्स यांना मागे टाकलं आहे. गॅरी सोबर्स यांच्या नावावर आठ शतकांची नोंद आहे.

शफीकची खेळी पाहून माझ्या बोटांची नखं संपली : स्मिथ

माझ्या बोटांची नखं संपली. शफीकने अप्रतिम खेळी करत आम्हाला शेवटपर्यंत चैन पडू दिलं नाही, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दिली. तर पराभवानंतरही मला माझ्या सहकाऱ्यांचा अभिमान आहे, असं मिसबाह उल हक म्हणाला.

संक्षिप्त धावसंख्या :

ऑस्ट्रेलिया : 429 आणि 202/5, डाव घोषित

पाकिस्तान : 142 आणि 450 धावा