इस्लामाबाद : पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये प्रवेशबंदी केल्यानंतर पाकिस्ताननेही दातओठ खात बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित करण्यास मनाई केली होती. मात्र ही स्वयंघोषित बंदी उठवत पाकिस्तानने चित्रपटांवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. सोमवारपासून पुन्हा भारतीय चित्रपट पाकमध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत.
आपण भारतीय चित्रपटांवर बहिष्कार टाकला नव्हता, तर काही काळासाठी स्क्रीनिंग थांबवलं होतं, असं स्पष्टीकरण पाकिस्तानातील बड्या चित्रपटगृहांनी दिलं आहे. आर्थिक व्यवहार सुरळीत राहण्यासाठी सिनेमा दाखवण्यास पुन्हा सुरु करणं गरजेचं असल्याचं मतही चित्रपटगृहचालकांनी व्यक्त केलं आहे.
नवाझुद्दीन सिद्दीकीचा 'फ्रिकी अली' हा बहिष्कार उठवल्यानंतर पाकमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट असेल. 30 सप्टेंबरला पाकिस्तानी थिएटरचालकांनी भारतीय चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. दहशतवादी हल्ल्यांनंतर पाक कलाकारांना भारतातून पळवून लावल्याचा निषेध म्हणून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
1965 मधील युद्धानंतर पाकिस्तानी चित्रपटगृहांतून भारतीय चित्रपटांना हद्दपार करण्यात आलं होतं. त्यानंतर 43 वर्षांनी म्हणजेच 2008 मध्ये ही बंदी उठवण्यात आली होती.