केपटाऊन : भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियाच्या खडतर दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात आश्वासक झाली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरु नये.


भुवनेश्वरनं केपटाऊन कसोटीत आपल्या स्विंग गोलंदाजीनं दक्षिण आफ्रिकेच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं. त्याच्या पहिल्याचं स्पेलनं यजमानांची स्थिती तीन बाद 12 अशी केली होती. त्यानंतर आफ्रिकेला 286 धावांची मजल मारता आली.

भुवनेश्वर कुमार विशेष करुन ओळखला जातो तो त्याच्या स्विंग गोलंदाजीसाठी. दक्षिण आफ्रिकन खेळपट्ट्या म्हणजे वेगवान आणि स्विंग गोलंदाजांचं नंदनवन. याच परिस्थितीचा फायदा घेत भुवनेश्वरनं केपटाऊनमध्ये वर्चस्व गाजवलं. भुवनेश्वरच्या आजवरच्या कसोटी कारकीर्दीत 20 कसोटीत 57 विकेट्स त्याच्या खात्यात जमा आहेत. यात भारतातील त्याची कामगिरी आहे 11 कसोटीत 27 विकेट्स तर भारताबाहेरच्या 9 कसोटीत 27.33 च्या सरासरीनं त्यानं 30 फलंदाजांना माघारी धाडलय.

भुवनेश्वर कुमारच्या आजवरच्या भारताबाहेरील सर्वोत्तम कामगिरीवर एक नजर टाकूया :

  • 82 धावांत 6 विकेट्स... 2014 च्या इंग्लंड दौऱ्यातल्या लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात भुवनेश्वरनं इंग्लंडच्या सहा फलंदाजांना माघारी धाडलं होतं. भुवीच्या या कामगिरीनं लॉर्ड्सवर टीम इंडियानं 28 वर्षानंतर कसोटी विजय साजरा केला होता.

  • 33 धावांत 5 विकेट्स... सेंट लुशियात झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत भुवनेश्वरनं ही कामगिरी बजावली होती. भारतानं ही कसोटी तब्बल 237 धावांनी जिंकली होती.

  • 82 धावांत 5 विकेट्स... इंग्लंडविरुद्धच्या नॉटींगहॅम कसोटीत भुवनेश्वरनं आपल्या स्विंग गोलंदाजीनं इंग्लडचा निम्मा संघ तंबूत धाडला होता.


केपटाऊन कसोटीतल्या भुवनेश्वरच्या गोलंदाजीनं  25 वर्षापूर्वीच्या टीम इंडियाच्या पहिल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची आठवण करुन दिली. या दौऱ्यातल्या दुसऱ्या कसोटीत यजमानांची तीन बाद 11 अशी घसरगुंडी उडाली होती. भारताच्या मनोज प्रभाकरनं त्यावेळी तीन दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना माघारी धाडलं होतं. मात्र ती कसोटी अनिर्णीत राहीली होती आणि मालिकाही भारताला गमवावी लागली होती.

दुर्दैवानं गेल्या पंचवीस वर्षात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत एकही मालिका जिंकता आलेली नाही. त्याचबरोबर सतरापैकी केवळ दोनच कसोटीत टीम इंडिया विजयी झाली आहे. मात्र यावेळी भुवनेश्वर कुमारसह इतर गोलंदाजांच्या केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावातील प्रभावी कामगिरीनं भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत एवढं नक्की.